राजकिय

माढ्याच्या निकालानंतर महायुतीत संशयकल्लोळ? शह-काटशहाचे राजकारण सुरू, विधानसभेला भाजप ताक ही फुकूंन पिणार !


प्रशांत आराध्ये
पंढरपूर – माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीची ताकद असतानाही भाजप चे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँगे्रस अजित पवार गटाचे आमदार आहेत त्याच विधानसभा मतदारसंघात भाजप खूप पिछाडीवर गेल्याचे चित्र असल्याने आता निकालानंतर महायुतीत संशयकल्लोळाचे वातावरण असल्याचे चित्र आहे. यावर आता वरिष्ठ पातळीवर विचारमंथन होवून शह-काटशहाचे राजकारण सुरू होईल, अशी चर्चा आहे.
माढा मतदारसंघातून निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी या निर्णयास उघड विरोध केला होता. त्यांचे बंधू हे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात सर्वाधिक सक्रिय राहिले आहेत. रामराजे निंबाळकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी केला खरा मात्र यास यश आले नाही. राजे निंबाळकर हे फलटणचे असून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे तेथीलच आहेत. दोघांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष आहे व तो उघडपणे असल्याने राजे निंबाळकर हे विरोध करणार हे निश्‍चित मानले जात  होते. अशा स्थितीत ही रणजितसिंह निंबाळकर यांनी आपल्या फलटण तालुक्यातून 16 हजार 928 चे मताधिक्य मिळविले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील सहापैकी विधानसभांपैकी तीन ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर दोन भाजप व एक शिवसेनेचा आमदार आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सातारा भागातून येत असल्याने तेथील फलटण व माण हे दोन विधानसभा मतदारसंघ जे माढ्याला जोडले आहेत तेथून त्यांना मताधिक्य मिळाले आहे. माण खटाव मधून 23 हजार 355 मताधिक्य त्यांनी मिळविले आहे. यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी काम केले आहे. तर शिंदे शिवसेनेचे आमदार असणार्‍या सांगोल्यातून निंबाळकर  यांना काठावर 4 हजार 442 चे मताधिक्य मिळाले आहे. हा मतदारसंघ आमदार शहाजीबापू पाटील यांचा आहे.
मात्र ज्या जे अजित पवार यांचे समर्थक आमदार आहेत त्या माढा व करमाळ्यातून निंबाळकर हे  93 हजाराहून अधिक मतांनी पिछाडीवर गेल्याचे चित्र होते. माढा मतदारसंघात जेंव्हा धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तेंव्हा भाजप ची सारी भिस्त ही माढा व करमाळ्यावर होती. कारण 2019 मोहिते पाटील यांनी माळशिरसमधून निंबाळकर यांना 1 लाख 16 हजाराचे मताधिक्य देवून निवडून आणले होते. मात्र मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षाकडून लढण्याचा निर्णय 2024 ला घेतल्यानंतर भाजप च्या वरिष्ठांनी आमदार बबनराव शिंदे तसेच आ. संजयमामा शिंदे  यांच्यावर निंबाळकर  यांना माढा व करमाळ्यातून मताधिक्य देण्याची जबाबदारी टाकली. लाखाचे मताधिक्य देण्याच्या घोषणा झाल्या मात्र प्रत्यक्षात 93 हजाराने भाजप पिछाडीवर आले.
ज्या माळशिरस तालुक्याने 2019 ला निंबाळकर यांना 1 लाख 16 हजाराचे मताधिक्य दिले होते त्याच तालुक्यातून यंदा मोहिते पाटील यांना 70 हजार 134 चे मताधिक्य आहे. येथून मोहिते पाटील लाखाहून अधिक मताधिक्य घेतील असे वाटत होते. कारण त्यांचा बालेकिल्ला तर आहेच मात्र उत्तमराव जानकर यांच्यासारखे नेते ही या निवडणुकीत मतभेद विसरून मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले होते. असे असताना ही मोहिते पाटील यांचे मताधिक्य त्या मानाने कमी मानले जात आहे. मात्र त्यांना माढा व करमाळ्यातून जास्त मतं मिळाली व 1 लाख 20 हजार मतांनी विजयी झाले.
यामुळे सहाजिकच भाजप ने माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील यांना रोखण्यासाठी खूप प्रयत्न केल्याचे दिसत आहे. या तालुक्यातून कमी कमी मताधिक्य धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळावे, यासाठी खूप धावपळ भाजप च्या नेत्यांना करावी लागली. जरी भाजप ला यात थोडेफार यश आले असले तरी माढा व करमाळ्यात मात्र या पक्षाला पिछाडीवर जावे लागले आहे. यामुळे निवडणुकीची सारी गणित चुकली.
माढा व करमाळ्यात आमदार शिंदे बंधू यांच्यावरच केवळ मताधिक्याची जबाबदारी नव्हती तर भाजप ने माढ्यात शिवसेनेचे नेते प्रा. शिवाजी सावंत व आमदार बबनराव शिंदे यांच्यात दिलजमाई करून त्यांना एकत्र आणले. तर दुसरीकडे करमाळ्यात आमदार संजयमामा शिंदे  यांच्या विरोधक असणार्‍या रश्मी बागल यांना भाजप आणून त्यांचा गट निंबाळकर यांच्या प्रचारात उतरवला. विधानसभेला एकमेकांविरोधात लढणारे शिंदे व  बागल गट एकाच व्यासपीठावर आलेले दिसले. असे असतानाही या दोन तालुक्यातून भाजप ला मिळालेली मतं  ही खूप कमी असून तेथूनच मोहिते पाटील यांनी मोठी आघाडी घेतल्याने आता महायुतीत संशयकल्लोळ निर्माण झाला असल्याचे दिसत आहे. ऐनवेळी लोकसभा निवडणुकीत एकमेकांचे विधानसभेचे विरोधक एकत्र आणल्याने कार्यकर्त्यांचे व इतर पदाधिकारी एकत्र येवून काम करतीलच असे सांगत येत नाही. कारण पुन्हा विधानसभेला त्यांना एकमेकांविरोधात राजकीय संघर्ष करावा लागणार आहे, हे त्यांना माहित असते.
महायुतीत वरिष्ठ पातळीवर अजून  पराभवाची कारणमिमांसा खोलात जावून झाली नसली तरी स्थानिक पातळीवर चर्चांना ऊत आला आहे. माढ्याला जोडलेल्या पंढरपूरच्या 57 गावांमधून मोहिते पाटीलच आघाडीवर राहिले असल्याचे चित्र आहे. येथे तर भाजप ने  शिंदे, परिचारक, काळे या गटाच्या स्वतंत्र बैठक घेवून प्रचार केला होता. विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना ऐनवेळी भाजप ला पाठिंबा द्यावयास लावला होता. तरीही मोहिते पाटील हेच  आघाडीवर राहिल्याने आता भाजप कशा पध्दतीने या पराभवाचेे विश्‍लेषण करणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
आता विधानसभा निवडणुकांचे वारे वाहणार असून या काळात भाजप ताक ही फुंकून पिणार हे निश्‍चित आहे. माढा लोकसभेला भाजप हा अन्य पक्षांवर जास्त विसंबून राहिल्याचे चित्र होते. निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी या पक्षाने तालुक्या तालुक्यातील एकमेकांचे विरोधक ही एकाच व्यासपीठावर आणले खरे मात्र त्यांचे मनोमिलन झाले होते की नाही, हा खरा संशोधनाचा विषय आहे.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close