भीमातील “एकी” सहकार शिरोमणीच्या निवडणुकीत टिकणार का ? जिल्ह्याचे लक्ष
मोहोळ तालुक्यातील टाकळी सिंकदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठीशी विठ्ठल परिवारातील सर्वच नेत्यांनी आपापसातील मतभेद विसरत ताकद लावली व विजय मिळविला. यानंतर महाडिक यांनी यापुढील काळात आणखी संघटितपणे काम करण्याचे आश्वासन दिले असले तरी आता यापुढील काळात विठ्ठल परिवारातील नेते एकमेकांशी जुळवून घेणार का? हा मोठा प्रश्न आहे. लवकरच सहकार शिरोमणी कारखान्याची निवडणूक होत असून यात विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांची भूमिका महत्वाची असून ते परिवारातील नेते कल्याणराव काळे यांना आव्हानं देण्याच्या तयारीत आहेत.
भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने विठ्ठल परिवारातील नेते टप्प्याटप्प्याने महाडिक यांच्या व्यासपीठावर आल्याचे चित्र होते. जून महिन्यात विठ्ठल कारखान्याची निवडणूक झाली व यात तीन गट उतरले होते. अभिजित पाटील यांनी स्वतंत्र निवडणूक लढवून कारखाना ताब्यात घेतला आहे. आता ते विठ्ठल परिवाराचे नेते मानले जातात. त्यांना विरोध करणार्या नेत्यांची संख्या मोठी आहे. भगीरथ भालके यांच्यासह कल्याणराव काळे यांनी पाटील यांना आव्हानं दिले होते. यात काळे व भालके यांना यश आले नाही. युवराज पाटील व त्यांच्या सहकार्यांनी विठ्ठलच्या निवडणुकीत कर्मवीर परिवार म्हणून सहभाग घेतला होता. युवराज पाटील हे भीमा कारखाना निवडणुकीपासून दूर राहिले आहेत.
धनंजय महाडिक यांचे विठ्ठल परिवाराशी चांगले संबंध असल्याने भगीरथ भालके व कल्याणराव काळे हे त्यांचा प्रचार करणार हे निश्चितच होते. कारण 2000 मध्ये पहिल्यांदा महाडिक यांची साथ कै. वसंतराव काळे यांनी केली होती तर 2004 नंतर सतत कै. भारत भालके यांनी खा. महाडिक यांना बरोबर घेण्याची भूमिका घेतली होती. ते संबंध काळे व भालके यांच्या पुढच्या पिढीने ही जपले आहेत. अभिजित पाटील यांनी भीमाची निवडणूक सुरू असताना महाडिक यांची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा दर्शविला व शेवटच्या सुस्ते येथील सभेत शक्तिप्रदर्शनाने व्यासपीठावर येत सभा गाजवली.
दरम्यान विठ्ठल परिवारातील नेते महाडिक यांच्यासाठी एकत्र आले असले तरी त्यांच्यातील मतभेद संपलेले नाहीत. विठ्ठलचे अध्यक्ष अभिजित पाटील हे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढण्याच्या मनःस्थितीत आहेत. याबाबतची त्यांची तयारी पूर्वीपासूनच सुरू आहे. यामुळे कल्याणराव काळे यांच्यासमोर मोठे आव्हानं यानिमित्ताने उभे ठाकले आहे. काळे यांनीही आतापासून सभासदांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. यंदासाठी त्यांनी 2511 रूपये प्रतिटन ऊसदर जाहीर केला असून सवलतीच्या दरात सभासदांना साखर वाटप ही केली जात आहे.
खा. महाडिक यांनी मोहोळ व पंढरपूर तालुक्यात राजन पाटील व प्रशांत परिचारक विरोधकांना एकत्र आणून आगामी काळात राजकीय व्यूहरचना आखण्याचे जाहीर केले असले तरी त्यांना विठ्ठल परिवारातील अंतर्गत मतभेद मिटविणे जिकरीचे जाणार हे निश्चित आहे. अभिजित पाटील हे महत्वकांक्षी असून ते स्वबळावर तालुक्यात नेतृत्व निर्माण करण्यावर भर देत आहेत. त्यांची अनेकांशी मैत्री असली तरी ते निवडणुका एकटेच लढणे पसंत करतात. यामुळे काळे कारखान्याची निवडणूक त्यांच्यासाठी महत्वपूर्ण आहे. यातच ज्या भगीरथ भालके गटाचा पराभव करून पाटील यांनी त्यांना जबर आव्हानं दिले आहेत, त्यांच्यात समेट घडणे कितपत शक्य आहे, असा सवाल पंढरपूर तालुक्यातून विचारला जात आहे.