Uncategorized

माढ्यासाठी भाजपाची मुंबईतून व्यूहरचना, फडणवीस अँक्शन मोड मध्ये


पंढरपूर – माढा लोकसभा मतदारसंघात भाजपा व महायुतीमध्ये उमेदवारीवरून निर्माण झालेला तिढा तर सुटलाच नाही, मात्र 2019 ला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी सर्वाधिक प्रचार करणारे मोहिते पाटील हेच पक्षापासून दूर जात निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याने आता 2024 च्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा, असा चंग बांधत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघातील महायुतीच्या नेत्यांना मुंबईत बोलावून घेवून चर्चा केली व पुढील व्यूहरचना आखली आहे.
ज्या माळशिरस तालुक्याने मागील निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्क दिले होते तेथील राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनाही खासदार निंबाळकर यांच्या पाठीशी उभे करण्यासाठी चर्चा सुरू आहे. जानकर यांना सोलापूर लोकसभेचे भाजपाकडून तिकिट दिले जाईल, अशी चर्चा होती व यासाठी जानकर यांनी तयारी केली होती. मात्र अचानक माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना संधी देण्यात आली. यामुळे जानकर समर्थक नाराज आहेत. दरम्यान जानकर समर्थकांच्या शिष्टमंडळाशी ही फडणवीस यांनी चर्चा केली असून लवकरच जानकर भाजपा उमेदवार निंबाळकर यांच्याबरोबर येतील, असा पक्षाला विश्‍वास आहे. दरम्यान जानकर यांनीही आता माळशिरस तालुक्यात गावभेट दौरा करत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यास सुरूवात केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुुंबईत सागर या निवासस्थानी माढा लोकसभा मतदारसंघातील आमदार व नेत्यांची बैठक बोलावली होती. ज्यास बबनराव शिंदे, संजयमामा शिंदे, जयकुमार गोरे यांच्यासह खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे उपस्थित होते. धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढण्याच्या तयारीत आहेत तर फलटणचे नेते रामराजे नाईक निंबाळकर व त्यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर  हे खा. निंबाळकर यांच्या उमेदवारीमुळे नाराज असल्याने याचा फटका निवडणुकीत बसू नये, यासाठी मुंबईतून आता व्यूरचना आखल्या जात आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीची ताकद असली तरी नाराजीमुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. माढा, करमाळा, माण खटाव तसेच सांगोला येथील आमदार हे ताकदीने खा. निंबाळकर यांच्या पाठीशी उभे आहेत. तर माळशिरसचे आमदार राम सातपुते सोलापूर लोकसभेचे उमदेवार असले तरी ते माळशिरस भागातील कार्यकर्त्यांना सतत सूचना करत आहेत. पंढरपूर भागातून परिचारक व काळे गट हा निंबाळकर यांना सहकार्य करत आहे. या मतदारसंघात शिंदे बंधू यांच्यावर खासदार निंबाळकर यांची मोठी भिस्त आहे. दोन विधानसभा मतदारसंघ त्यांच्या ताब्यात आहेत. यामुळेच फडणवीस यांनी मुंबईत बैठक घेवून प्रचाराची व्यूहरचना आखली असल्याचे सांगितले जात आहे. उत्तम जानकर याची साथ मिळाली तर माळशिरस तालुक्यात भाजपा याचा फायदा होवू शकतो. याच तालुक्याने 2019 ला लाखाहून अधिक मताधिक्य दिले होते. तेंव्हा सर्व प्रमुख गट भाजपा सोबत आले होते. यंदा मोहिते पाटील गट दूर आहे. 

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Close
Close