यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार, राज्यातील प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलने कमी जलसाठा
पंढरपूर – राज्यातील लहान, मध्यम व मोठ्या 2 हजार 994 प्रकल्पांमध्ये सध्या 37 टक्के पाणी शिल्लक असून गतवर्षीच्या तुलनेत ते आठ टक्क्यांनी कमी आहे. यंदा उन्हाळा तीव्र असून तापमानात रोज वाढ होत असल्याने धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन वाढत आहे.
राज्यात 2 हजार 994 लहान ते मोठे प्रकल्प असून त्यांची उपयुक्त पाणी साठवण क्षमता 40 हजार 485 दशलक्ष घनमीटर एवढी असून यात सध्या 14 हजार 984 दलघमी उपयुक्त पातळीत पाणी साठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलने 8.74 टक्के पाणी कमी आहे. मोठ्या धरणांचा विचार केला तर 138 योजनांमध्ये 36.52 टक्के पाणी उपलब्ध असून मागील वर्षी 44 टक्के जलसाठा शिल्लक होता. सर्वात कमी पाणी औरंगाबाद विभागात असून येथील 44 प्रकल्पांमध्ये 20.99 टक्के पाणी आहे. मागील वर्षी 41 टक्के जलसाठा मराठवाड्यात शिल्लक होता. या भागात पुढील तीन महिने पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पुणे विभागात 35.22 टक्के जलसाठा आजच्या तारखेला उपलब्ध असून 2023 ला याच दिवशी तेथे 46 टक्के पाणी उपलब्ध होते. जवळपास अकरा टक्के पाणी कमी असल्याने उन्हाळ्यात या भागातही जलटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
नागपूर विभागात 48.13 टक्के तर अमरावती मध्ये 44.72, नाशिक 38.56, कोंकण 43.43 टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने मध्यम व लघु प्रकल्पांची स्थिती सर्वत्रच दयनीय झाली आहे. राज्यात मध्यम योजनांमध्ये 43.36 टक्के पाणी शिल्लक आहे. तर लघु प्रकल्पांत 33 टक्के जलसाठा आहे. मराठवाड्यात सर्वात कमी पाणी शिल्लक आहे. औरंगाबाद विभागात मध्यम प्रकल्पात 18.49 तर लघु योजनांमध्ये 14.72 टक्के पाणी आहे. पुणे विभागात मध्यम योजनांत 42.28 तर लघु प्रकल्पात 33.41 टक्के पाणी शिल्लक आहे.
उजनी वजा 36.71 टक्के
सोलापूर जिल्ह्यासह जलाशयकाठावरील पुणे, अहमदनगर भागाची तहान भागविणार्या उजनी धरणाची स्थिती चिंताजनक असून आजच्या तारखेला धरण वजा 36.71 टक्के आहे. मागील वर्षी याच तारखेला धरणात 27 टक्के उपयुक्त पाणी शिल्लक होते. यंदा 2023 च्या तुलनेत 63 टक्के पाणी कमी असल्याने येत्या काळात सोलापूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. धरणातील मृतसाठ्यातील 19.67 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. धरणात सध्या मृत पातळीत 43.99 टीएमसी पाणी शिल्लक आहे. तीव्र उन्हाने बाष्पीभवन वाढले असून मागील चोवीस तासात 6.40 मिलीमीटर म्हणजेच 0.74 दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन नोंदले गेले आहे.