थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील भटूंबरेत एक लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त
पंढरपूर – नवीन वर्षाच्या आगमन पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गोवा राज्यातून दारुच्या अवैधरित्या होणा-या तस्करीवर करडी नजर ठेवण्यात येत असून शुक्रवारी (ता. 30 डिसेंबर) पंढरपूर तालुक्यातील भटूंबरे गावाच्या हद्दीत एका पत्र्याच्या खोलीतून 1 लाख किंमतीची गोवा बनावटीची विदेशी दारु जप्त केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, नवीन वर्षाच्या निमित्याने अवैध व बनावट दारुला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई करण्यात येत असून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पंढरपूर विभागाचे निरीक्षक पवन मुळे यांनी त्यांच्या पथकासह 30 डिसेंबर शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास पंढरपूर-शेटफळ रोडच्या कडेला असलेल्या भटूंबरे गावाच्या हद्दीत एका पत्र्याच्या खोलीतून नवीन वर्षाच्या अनुषंगाने अवैधरित्या विक्रीकरीता साठवून ठेवलेली 1 लाख तीन हजार किंमतीची गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली विदेशी दारु जप्त केली आहे. यात एड्रियल व्हिस्कीच्या 750 मिलीच्या 120 बाटल्या, मॅकडॊवेल नंबर 1 व्हिस्कीच्या 180 मिलीच्या 90 बाटल्या, इंपेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या 180 मिलीच्या 90 बाटल्या व रॊयल स्टॅग व्हिस्कीच्या 180 मिलीच्या 52 बाटल्या असा मुद्देमाल जप्त केला असून गुन्ह्यातील आरोपी हा फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पवन मुळे, दुय्यम निरीक्षक अंकुश आवताडे, कैलास छत्रे, मानसी वाघ, सहायक दुय्यम निरिक्षक जीवन मुंढे, जवान गणेश रोडे, अनिल पांढरे , तानाजी काळे, प्रशांत इंगोले यांच्या पथकाने पार पाडली.