४२ गावांना सतर्कतेचा इशारा, ६ बंधारे पाण्याखाली जाणार ; पंढरपूरमध्ये किती विसर्ग असताना कोणत्या भागात पाणी शिरते..
भीमा नदीपात्रात 1 लाख 15 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( 443.600 पाणी पातळी मीटर) नदीकाठी असणार्या व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरते. 1 लाख 38 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( 443.600 पाणी पातळी मीटर) गोपाळपूर येथील नवीन पुलावर पाणी येते. तर 1 लाख 70 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( 445.500 पाणी पातळी मीटर) संतपेठ झोपडपट्टीतील सखल भागात पाणी येते. तर 1 लाख 97 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( 446.300 पाणी पातळी मीटर) गोविंदपुरा येथे पाणी येते वाढता विसर्ग पाहता नागरिकांनी सतर्कता बाळगावी. असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
भीमा नदीवरील पंढरपूर तालूक्यातील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर,मुंढेवाडी, पूळूज हे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली जात असल्याने या बंधार्यावरुन होणारी वाहतूक बंद राहणार आहे.
चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या 42 गावातील नागरिकांना सतर्कता बाळगावी. नदीपात्रात उतरु नये. स्थानिक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तलाठी, मंडलअधिकारी, पोलीस पाटील पुरस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी. प्रशासनास सहकार्य करावे.असे आवाहन तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी केले आहे.
पंढरपूर : उजनी धरण व वीर धरण परिसरात सुरु असलेल्या पावसामूळे धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. उजनी धरणातून दुपारी 4.30 वाजता धरणातून 91 हजार 600 क्युसेकचा तर वीरधरणातून 43 हजार 377 क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. तर नदीला मिळणार्या लहान मोठ्या ओढ्यातूनही पाणी मिसळत आहे. त्यामुळे भीमा नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
गणशोत्सवापासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरु होता.मात्र, गणपती विसर्जनानंतर पाऊस कमी झाल्याने विसर्गातही घट करण्यात आली होती. तर मागील दोन दिवसापासून उजनी व वीर धरण क्षेत्र परिसरात पुन्हा दमदार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. शुक्रवार दि.16 रोजी दुपारी 4 वाजता उजनी धरणातून भीमा नदीपात्रात 91 हजार 600 क्युसेकचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तर वीर धरणातून 43 हजार 377 क्युसेकचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. हा विसर्ग शनिवारी पहाटेपर्यंत पंढरपूर येथे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दगडी पूल, 6 बंधारे पाण्याखाली जाणार आहेत तर पुंडलिक मंदिरांसह विष्णुपद मंदिराला पाण्याने वेढा दिल्याने मंदिरे पाण्यात अर्धी बुडणार आहेत.
सद्या देखील नदी पात्रात पाण्याच्या पातळी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपर्यंत चंद्रभागा पात्रातील दगडी पूल तसेच नदीवरील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर,मुंढेवाडी, पूळूज हे 6 बंधारे पाण्याखाली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
उजनी धरणातून पुन्हा मोठा विसर्ग भीमा नदीपात्रात करण्यात येत आहे. चंद्रभागा नदी काठच्या भागातील शेतीला पाण्याचा फटका बसणार आहे. तर नदीकाठच्या ओढ्यांमधून देखील पाणी मागे सरकणार असल्याने अनेक ठिकाणची रस्ते वाहतूक बंद पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पंढरपूर ते जुना अकलूज रोडवर शिरढोण येथील ओढ्यावरील पुलावर पाणी येत असल्याने वाहतूक बंद होणार आहे. तर पुरस्थिती उदभवली की या भागातील विद्युत पुरवठा बंद करावा लागत आहे.