राज्य

उजनी , वीरच्या विसर्गामुळे भीमेच्या पाणीपातळीत वाढ, कुटुंबांचे स्थलांतर ; बंधारे पाण्याखाली

पुराचे पाणी व्यास नारायण झोपडपट्टी शिरले तर येथील नागरिकांना उपजिल्हा रुग्णालय समोरील रायगड भवन मठ येथे निवारा सोय करण्यात आली आहे. येथे 500 नागरिकांची सोय करण्यात आली आहे तर अंबिका नगर येथील स्थळातरितांसाठी लोकमान्य विद्यालय , जुन्या कोर्टासमोर सोय करण्यात आली आहे येथे 1000 नागरिकांची क्षमता आहे. येथे नगर पालिका स्वच्छता, पिण्याचे पाणी व इतर सुविधा पुरवणार आहे तर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती नाश्ता व जेवण पुरवणार आहे.
गजानन गुरव, प्रांताधिकारी

पंढरपूर : उजनी धरण व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. उजनी धरणातून 91 हजार 600 क्युसेकचा तर वीरधरणातून कमी करून तो 15 हजार 911 क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. तर नदीला मिळणार्‍या लहान मोठ्या ओढ्यातूनही पाणी मिसळत आहे. त्यामुळे भीमा नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे, चंद्रभागा नदीची पाणी पातळी सातत्याने वाढत होत असल्याने व्यासनारायण झोपडपट्टी व अंबिका नगर झोपडपट्टी येथील 50 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरू आहे. महाद्वार घाटावरील 6 झोपडपट्टी तील 25 नागरिक त्यांच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले आहेत. तर पूरस्थिती उद्भवल्यास व्यास नारायण झोपडपट्टी व अंबिकानगर झोपडपट्टी त पाणी शिरत आहे. त्यामुळे आवश्यकता भासल्यास येथून स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबासाठी प्रशासनाकडून निवारा, पाणी, अन्नाची, औषध उपचार, मंदिर समिती मार्फत भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.

उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मागील पाच दिवसापासून दमदार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. शुक्रवार दि.16 रोजी सायंकाळी 5.00 वाजता उजनी धरणातून भीमा नदीपात्रात 91 हजार 600 क्युसेकचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तो कायम आहे तर वीर धरणातून 43 हजार 377 क्युसेकचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. परंतु यात सकाळी घट करून हा विसर्ग 15 हजार 911 करण्यात आला आहे. सध्या भीमा नदी पात्रात 91हजार 924 क्युसेक वेगाने पाणी वाहत आहे. चंद्रभागा नदी पत्रातील पाणी पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे दगडी पूल, 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर पुंडलिक मंदिरांसह विष्णुपद मंदिराला पाण्याने वेढा दिल्याने मंदिरे पाण्यात अर्धी बुडाली आहेत.
सद्या देखील नदी पात्रात पाण्याच्या पातळी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपर्यंत चंद्रभागा पात्रातील दगडी पूल तसेच नदीवरील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर,मुंढेवाडी, पूळूज हे 6 बंधारे पाण्याखाली गेले असल्याचे प्रशासन नाकडून सांगण्यात येत आहे.

पंढरपूर येथे सध्या एक लाख क्यूसेक विसर्ग सुरू आहे, तर तालुक्यातील ओढे, नाले यांचाही विसर्ग मिसळत असल्याने सध्या नदीकाठच्या झोपडपट्टी मध्ये पुराचे पाणी शिरले आहे. तर जेथे नदीचे पात्र अरुंद आहे, तेथे पुराचे पाणी पात्राबाहेर पडून तसेच ओढ्यांद्वारे माघारी सरकत असल्याने पुराच्या पाण्यात पिके बुडाली जात आहेत तर बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांची वाहतूक बंड पडत आहे.
पंढरपूर ते जुना अकलूज रोडवर शिरढोण येथील ओढ्यावरील पुलावर पाणी येत असल्याने वाहतूक बंद झाली आहे.

भीमा नदीपात्रात 1 लाख 15 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( 443.600 पाणी पातळी मीटर) नदीकाठी असणार्‍या व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरते. 1 लाख 38 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( 443.600 पाणी पातळी मीटर) गोपाळपूर येथील नवीन पुलावर पाणी येते. तर 1 लाख 70 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( 445.500 पाणी पातळी मीटर) संतपेठ झोपडपट्टीतील सखल भागात पाणी येते. तर 1 लाख 97 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( 446.300 पाणी पातळी मीटर) गोविंदपुरा येथे पाणी येते वाढता विसर्ग पाहता नागरिकांनी सतर्कता बाळगावी. असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

भीमा नदीवरील पंढरपूर तालूक्यातील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर,मुंढेवाडी, पूळूज हे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली जात असल्याने या बंधार्‍यावरुन होणारी वाहतूक बंद झाली आहे.

चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या 42 गावातील नागरिकांना सतर्कता बाळगावी. नदीपात्रात उतरु नये. स्थानिक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तलाठी, मंडलअधिकारी, पोलीस पाटील पुरस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी. प्रशासनास सहकार्य करावे.असे आवाहन तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांनी केले आहे.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close