विशेष

आजपासून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे चोवीस तास दर्शन सुरु 

पंढरपूर –  कार्तिकीवारीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी होणारी वाढती गर्दी लक्षात घेता आलेल्या भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे  दर्शन सुलभ व तत्पर होण्यासाठी शुक्रवार 28 ऑक्टोबर 2022 पासून ‘श्री’ चे दर्शन 24 तास सुरु ठेवण्यात आले असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.

कार्तिक शुद्ध एकादशी सोहळा 4 नोव्हेबर रोजी होणार असून, या  यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी पंढरपूरात सुमारे 8 ते 10 लाख भाविक येतात. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेवून, मंदिर प्रशासनाकडून चांगला दिवस मुहर्त पाहून श्रीं चा पलंग काढून भाविकांसाठी 28 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2022 या कालावधीत 24 तास दर्शन सुरु ठेवण्यात आले असल्याचे व्यवस्थापक पुदलवाड यांनी सांगितले.  

सकाळी  देवाच्या शेजघरातील चांदीचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला. श्री  विठ्ठलास  मऊ कापसाचा लोड तर रुक्मिणीमातेस तक्या देण्यात आला आहे. आजपासून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळपूजेपर्यंत (दि.13 नोव्हेंबर) बंद राहतील. या कालावधीत श्री ची नित्यपुजा, महानैवद्य, गंधाक्षता हे नित्योपचार सुरु राहतील. नित्योपचाराची वेळा वगळता श्री  चे पददर्शन 22.15 तास सुरु राहिल तर मुखदर्शन 24 तास सुरु असेल .

श्री चे दर्शन 24 तास सुरु केल्याने आता दररोज सुमारे 35 ते 40 हजार भाविकांना पददर्शन तर सुमारे 40 ते 45 हजार भाविकांना मुखदर्शन मिळणार आहे. कार्तिकी यात्रा कालावधीत श्री चे 24 तास दर्शन सुरु केल्याने भाविकांना कमी अवधीत दर्शन  होणार असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.

           यावेळी मंदिर समितीचे सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ॲड.माधवी निगडे, लेखा अधिकारी अनिल पाटील, विभाग प्रमुख श्री पांडुरंग बुरांडे आणि पौरोहित्य करणारे मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close