उजनीत गतवर्षीपेक्षा यंदा जास्त पाणीसाठा शिल्लक
पंढरपूर- सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणार्या उजनी धरणात आजच्या तारखेला उपयुक्त पातळीत 74.57 टक्के पाणीसाठा शिल्लक असून जो गतवर्षीच्या म्हणजे 2021 च्या तुलनेत अकरा टक्के जास्त आहे. राज्यातील सर्व 141 मोठ्या प्रकल्पांचा विचार केला तर सध्या यात सरासरी 70.78 टक्के जलसाठा आहे.
मागील दोन तीन वर्षांपासून उजनी धरणाच्या पर्जन्यक्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरण क्षमतेने भरत आहे. तर मागील सलग दोन वर्षे पावसाळा लांबला होता तसेच अवकाळी पावसानेही जोरदार हजेरी लावल्याने उजनीच्या लाभक्षेत्रातून रब्बीच्या हंगामात पाण्याची मागणी कमी होती. यामुळे उन्हाळा हंगामात उजनीतून सिंचनासाठी मुबलक पाणी देता येत आहे. सध्याही आवर्तन सुरू असून आता कालवा विसर्ग कमी करून तो 300 क्युसेक इतकाच ठेवण्यात आला आहे. तर सिना माढा तसेच सीना- भीमा बोगदा व दहिगाव योजनेसाठी पाणी सोडले जात आहे. भीमा नदीत 6 हजार क्युसेकचा विसर्ग आहे.
दरम्यान मागील महिन्यात पहिले उन्हाळा आवर्तन सुरू करताना उजनी शंभर टक्क्याहून अधिक भरली होती. सिंचन योजना व नदीत पाणी सोडल्याने धरण 14 मार्च रोजी 74.57 टक्के पाणी स्थितीत आहे. या प्रकल्पात सध्या एकूण 103.61 टीएमसी पाणीसाठा असून यातील उपयुक्त पातळीतील पाणी हे 39.95 टीएमसी इतके आहे. दरम्यान आता उन्हाळा वाढत असल्याने पाण्याचे बाष्पीभवन वाढत असून मागील चोवीस तासात 5.26 मि.मी. पाणी बाष्पीभवनामुळे कमी झाले आहे.
मागील वर्षी 2021 ला याच तारखेला धरण 63.87 टक्के उपयुक्त पातळीत भरले होते. हे पाहता यंदा जवळपास अकरा टक्के पाणी धरणात जास्त आहे. यामुळे उन्हाळ्यात शेतीला मुबलक पाणी मिळू शकते. यंदा जिल्ह्यात उसाचे पीक जास्त असल्याने उन्हाळ्यात पाण्याची सोय होत आहे. राज्याचा विचार केला तर आजच्या तारखेला मोठ्या 141 धरणांमध्ये सरासरी 70.78 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उजनी धरणात या सरासरीपेक्षा चार टक्के पाणी जास्त आहे. राज्यात मागील वर्षी 14 मार्चला 64.16 टक्के पाणीसाठा होता. पुणे विभागात 76 टक्के जलसाठा असून तो मागील वर्षीपेक्षा पंधरा टक्क्यांनी जास्त आहे.