राजकिय

मामा- भाऊंच्या इंदापुरातील राजकारणाचे सोलापूर जिल्ह्यात पडसाद

 

पंढरपूर- पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदारसंघात सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात जोरदार राजकीय रस्सीखेच सुरू असते. आता त्याचे पडसाद सोलापूर जिल्ह्यात पडू लागले आहेत. मगरवाडी येथील तरूण शेतकरी सूरज जाधव याच्या आत्महत्येनंतर पालकमंत्र्यांनी त्याच्या कुटुंबाची अद्याप भेट घेतली नाही हे पाहता  हर्षवर्धन पाटील यांनी तेथे जावून आर्थिक मदत देत भरणे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
दरम्यान भारतीय जनता पक्षाने हा विषय ऐरणीवर आणला आहे. सोलापूर जिल्हा भाजपाने इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी या पालकमंत्र्यांच्या गावात जावून आंदोलन केले होते. इंदापूर तालुक्यात भरणे व पाटील यांच्यात राजकीय संघर्ष असून सलग दोन निवडणुकांमध्ये भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला आहे. पाटील हे अगोदर काँग्रेसमध्ये होते मात्र त्यांनी 2019 ला भाजपात प्रवेश केला मात्र त्यांचा पराभवाने पिच्छा सोडला नाही. आघाडी सरकारच्या काळात अनेक महत्वाची खाती सांभाळलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे आता भाजपात फडणवीस यांचे निकटवर्तीय बनले आहेत.
पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पाटील व पवार यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रृत आहे. उपमुख्यमंत्री अजित  पवार यांचे व पाटील यांचे कधीच सूर जुळले नाहीत. एकाच मंत्रिमंडळात असून त्यांच्यातील संघर्ष मागेही कमी झाला नव्हता. यानंतर 2014 ला राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत पाटील यांना पराभूत केले तर 2019 ला त्यांनी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवित पाटील यांना पुन्हा हरवले. इंदापूर मतदारसंघ हा राज्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा बनला आहे. भरणे यांनी दिलेली लढत व मिळविलेले विजय पाहूनच त्यांना सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्रिपद बहाल करण्यात आले आहे.
आता तेथील राजकीय संघर्ष सोलापूर जिल्ह्यात पोहोचला आहे. मगरवाडी येथील तरूण शेतकरी सूरज जाधव याच्या आत्महत्येनंतर भाजपाने राज्य सरकारला धारेवर धरले. घटना घडून दहा दिवस झाले तरी पालकमंत्री येथे न आल्याने भाजपाला तो आयता मुद्दा मिळाला व हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातून दोन लाख रूपयांची मदत गोळा करून ती मगरवाडीत येवून जाधव कुटुंबाला देवू केली. यावेळी त्यांनी पालकमंत्री यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान येथील भाजपाने ही भरणेवाडीत जावून आंदोलन केले होते.
इंदापूर तालुक्यातील सत्तासंघर्ष आता वाढत चालला असून  दत्तात्रय भरणे हे येथील पालकमंत्री असल्याचे याचे लोण सोलापूर जिल्ह्यात पोहोचले आहेत.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close