करमाळा, दि. १२- बागल आणि मोहिते – पाटील कुटुंबात जिव्हाळ्याचे संबंध होते. परंतु गेल्या काही काळात नाराजी झाली आणि मतभेद निर्माण झाले. पण मनभेद झाले नव्हते, त्यामुळे आदिनाथ कारखान्यातील सह्यांच्या अधिकाराचा विषय आल्यावर बागल यांचे नाव पुढे केले होते. येत्या काळात बागल कुटुंबाशी संबंध पुन्हा सुधारले जातील, असे आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी स्पष्ट केले.
करमाळा येथे आयोजित लोकनेते दिगंबरराव बागल कृषी महोत्सव कार्यक्रमात करमाळा विधानसभा मतदार संघातील शहीद जवानांच्या वारसांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विखे – पाटील बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. रणजितसिंह मोहिते – पाटील, आ. सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, शिवाजी कांबळे, बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, दीपक चव्हाण उपस्थित होते.
दरम्यान मोहिते पाटील यांच्या या विधानामुळे आगामी काळात बागल गटाला सोबत घेत ते आता करमाळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार संजय शिंदे यांच्यासमोर आव्हानं उभे करण्याची तयारी करत असल्याचे दिसत आहे. मोहिते पाटील व आ.संजय शिंदे, आ. बबनराव शिंदे यांच्यात राजकीय संघर्ष आहे. करमाळाच्या राजकारणात आ. संजयमामा शिंदे यांनी जगताप गटाला बरोबर घेत आपली ताकद वाढवली आहे. हे पाहता मोहिते पाटील गट ही माझी आमदार नारायण आबा पाटील यांना ताकद देत आहे. राज्यात सत्तांतर होवून शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर येथे आदिनाथ कारखान्याच्या निमित्ताने बागल, पाटील एकाच व्यासपीठावर दिसत आहेत. यातच आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत येथे शिंदे विरोधकांना मदत करत आहेत. यातच अकलूजच्या मोहिते पाटील यांनी बागल गटाबरोबर काम करण्याचा निश्चय केल्याने आता आ. शिंदे यांच्या समोर आव्हानं असणार आहे. दरम्यान येथील कृषी महोत्सवाचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले. तर भाजपाचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी बागल यांना भाजपात येण्याचे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देश बलवान होत आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर मोदी यांच्या काळात शेती क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे. देश रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबाचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
सुरुवातीला कृषी महोत्सवाचे संकल्पक विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे निमंत्रक राज्य सहकारी साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल, स्वागताध्यक्ष दिग्विजय बागल यांनी उपस्थितांचे सन्मान केले. तर पालकमंत्री विखे – पाटील यांच्या हस्ते शहीद जवानांच्या वारसांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.पुढे बोलताना विखे – पाटील यांनी, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या काळात माझे कुटुंब तुमची जबाबदारी असे सांगत अडीच वर्षे फेसबुक कारभार करुन राज्याचा विकास ठप्प केल्याचा आरोप केला.
याप्रसंगी बोलताना आ. मोहिते – पाटील यांनी जातेगाव ते टेंभुर्णी या रखडलेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात पालकमंत्री विखे – पाटील यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, रस्ता कामातील भु संपादन कामासाठी स्वतंत्र अधिकारी नेमला जावा, उजनी लाभक्षेत्रात उजनीतून होणाऱ्या जलमार्ग प्रवास सुविधेचा विचार करुन धक्का उभारला जावा. अशा मागण्या केल्या. तसेच, यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्व. दिगंबरराव बागल यांच्या आठवणी सांगितल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिग्विजय बागल यांनी तर सूत्रसंचालन शेखर जोगळेकर यांनी केले. आभार रश्मी बागल यांनी मानले.