सीना माढा योजनेसाठी 50 कोटींचा निधी
पंढरपूर – राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये माढा तालुक्याची वरदायिनी असणार्या सीना- माढा सिंचन योजनेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50 कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिलेली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री फडणीस यांच्याकडे शिंदे यांनी या योजनेसाठी निधीची मागणी केली होती व सातत्याने पाठपुरावा केला होता. ही योजना 2004 साली मंजूर होऊन कामास सुरुवात झाली. पुढे टप्प्याटप्प्याने माढा तालुक्यात या योजनेच्या कालव्याचे जाळे पसरले व याद्वारे सध्या 16 हजार हेक्टर (चाळीस हजार एकर) क्षेत्र ओलिताखाली येत असून ओढे, नाले, विहिरी,तळी यांना या योजनेमुळे कधीच पाणी कमी पडत नाही. आमदार बबनदादा शिंदे यांच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामार्फत योग्य प्रकारे होत असलेल्या नियोजनामुळे सीना – माढा सिंचन योजना यशस्वीपणे कार्यरत आहे.
मंजूर झालेल्या निधीमधून सीना- माढा सिंचन योजनेच्या मुख्य कालव्याच्या लायनिंगचे काम प्रामुख्याने करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भूसंपादन तसेच मोडनिंब विभागातील सोलंकरवाडी, जाधववाडी ,वैरागवाडी या ठिकाणच्या पोट कालव्याची कामे केली जाणार आहेत. अनेक ठिकाणी कालव्याचे गेट्स (दरवाजे ) खराब झाले आहेत ते बदलले जातील. तर अत्यावश्यक ठिकाणी नवीन गेट्स बसवण्याचेही नियोजन असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.
साखर कारखान्याच्या उत्कृष्ट नियोजनामुळे या योजनेचे वीज बिल कधीही थकीत राहिलेले नाही. तसेच मशिनरी दुरुस्ती किंवा पाइपलाइन लिकेज, दुरुस्त्या यासाठी कारखान्याची यंत्रणा नेहमी सज्ज असते. सध्या या योजनेतून उन्हाळी आवर्तन सुरू असून तालुक्यातील 40 हजार एकर क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यात येत आहे.