पंढरीत अवैध वाळू उपश्यावर महिला तलाठी पथकाची कारवाई
पंढरपूर, दि. 19 : पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणार्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव व तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेमन्यात आलेल्या महिला तलाठी भरारी पथकाने रविवार दि. 18 जून रोजी शेगाव दुमाला येथे व रेल्वे पुलाखाली कारवाई करत दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून 30 पोती वाळू नदीपात्रात पसरण्यात आली आहे.
नदीपात्रातील अवैधवाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने महिला तलाठी पथकाची नेमणूक केली. या भरारी पथकात महिला तलाठी विजया नाईक, अनुप्रिता शेलार, पुष्पा काळे, उज्वला जाधव, रोहिणी पाटील, अश्विनी शेंडे, अनिता जाधव, राधा कचरे, वर्षा बरबडे यांनी सहभागी होत कारवाई केली आहे..
या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार शेगाव दुमाला येथे वाळूची अवैध वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी दुचाकी क्रमांक (एमएच 13 -एव्ही 5488) जप्त केली आहे. तसेच नदीकाठी असलेला 10 पोती वाळूसाठा नदी पात्रात ढकलण्यात आला. तर पंढरपूर येथील भीमा नदी पात्रातील रेल्वे पुलाखाली अवैध वाळू वाहतूक करणारी दुचाकी क्रमांक (एमएच13 सीए 5481) जप्त केली आहे. तसेच नदीकाठी सापडलेला 20 पोती अवैध वाळू साठा नदीपात्रात ढकलण्यात आला. वाळू चोरी करणारा युवराज शिवाजी जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.