राजकिय

सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे सभासद कोणावर विश्‍वास दाखवणार ? रविवारी स्पष्ट होणार

पंढरपूर-  तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी रविवार 18 रोजी होत असून अत्यंत चुरशीने मतदान झालेल्या या संस्थेची सत्ता सभासद कोणाच्या हाती देणार हे आता समजून येईल. या कारखाना निवडणुकीत सत्ताधारी कल्याणराव काळे यांच्या गटाला विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी कडवे आव्हानं दिले आहे.
रविवारी सकाळी येथील शासकीय गोदामात मतमोजणी होत असून  यासाठी प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. 40 टेबलवर मतमोजणी होत असून यासाठी 240 कर्मचारी काम पाहणार आहेत. शासकीय गोदामाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ही तैनात असेल. शुक्रवार 16 रोजी विक्रमी असे 93.97 टक्के मतदान झाले आहे. आता सार्‍यांचे लक्ष मतमोजणीकडे आहे.
या कारखान्यावर स्थापनेपासून कल्याणराव काळे यांची सत्ता असून ते चोवीस वर्षे चेअरमन आहेत. यापूर्वीही या कारखान्याच्या निवडणुका झाल्या असल्या तरी इतकी चुरस कधीही पाहावयास मिळाली नाही. विठ्ठल कारखाना ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अभिजित पाटील यांनी सहकार शिरोमणी कारखाना निवडणूक लढविण्याचा निश्‍चय केला होता. त्यानुसार त्यांनी येथे पॅनल लावले. ते स्वतः या कारखान्याचे सभासद नसले तरी त्यांनी डॉ. बी.पी.रोंगे व अ‍ॅड. दीपक पवार यांना बरोबर घेत काळे यांच्यासमोर आव्हानं उभे केले आहे.
सुरूवातीला एकतर्फी निवडणूक होईल, असा अंदाज वर्तविला जात असताना प्रचारात पाटील गटाने आघाडी घेत काळेंसमोर जबर आव्हानं उभे केले. ऊसबिलाचा मुद्दा या निवडणुकीत खूप गाजला. या निवडणुकीच्या निमित्ताने विखुरलेला विठ्ठल परिवार एक करण्यात कल्याणराव काळे यांना यश आले असून अभिजित पाटील यांची वाढती ताकद रोखण्यासाठी काळे, भगीरथ भालके, युवराज पाटील व गणेश पाटील पुन्हा एकत्र आले आहेत.
या निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर भागातील राजकारणाचा कल समजणार असून अभिजित पाटील यांच्यावर ज्या प्रमाणे विठ्ठलच्या सभासदांनी विश्‍वास टाकला तसा सहकार शिरोमणीचे सभासद टाकणार का? हा मोठा प्रश्‍न आहे. कारण येथील सभासद हे काळेंसोबत स्थापनेपासून आहेत. मागील निवडणुकीत काळे यांच्यासमोर डॉ. रोंगे व अ‍ॅड. पवार यांनी स्वतंत्र पॅनल लावून आव्हानं उभे केले होते. मात्र यंदा ते एकत्र आले असल्याने याचा कितपत परिणार होईल हे मतमोजणीनंतर लक्षात येईल.
सहकार शिरोमणी कारखान्याच्या मतमोजणीकडे सार्‍यांचे लक्ष असून अभिजित पाटील विठ्ठल प्रमाणे या कारखान्यात चमत्कार घडवतील, अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. तर पाटील यांना रोखण्यासाठी या भागातील सर्व प्रस्थापित गट-तट एक झाल्याचे चित्र आहे. 

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close