राजकिय

आपले मोहिते पाटलांबरोबरचे संबंध बिघडण्यास प्रसार माध्यम जबाबदार असल्याचा खा. निंबाळकरांचा दावा

अकलूज – मी स्पष्टपणे मान्य करतो की, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि माझ्यामध्ये थोडा दुरावा निर्माण झाला आहे. प्रसिध्दी माध्यमांमधून आलेल्या काही एकतर्फी बातम्यांमुळे आमच्यामध्ये गैरसमज वाढले आहेत. आता हे गैरसमज माध्यमांच्या माध्यमातून दूर होतील,असे माढा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अकलूज येथे पत्रकारांशी चर्चा करताना सांगितले.

शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी खा. नाईक निंबाळकर हे अकलूज येथे आले होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी चर्चा करताना आपल्यात आणि मोहिते-पाटील यांच्यात दुरावा का निर्माण झाला आहे असा प्रश्न विचारताच त्यांनी आपल्या मनातील तळमळ बोलून दाखवली.

मला खासदार करण्यामागे मोहिते-पाटील परिवाराचा मोठा हात आहे हे मी कधीही नाकारणार नाही. कारण मी उपकार विसरणारा नाही. आ. रणजितसिंहांना मंत्रिपद मिळावे यासाठी मी पक्षाकडे प्रयत्न करत होतो. परंतु माळशिरस भागातून प्रसिध्दी माध्यमांमधून सतत माझ्या विरोधात लिखाण होत गेले. त्यामुळे आ. मोहिते-पाटील व माझ्यामध्ये बरेच गैरसमज निर्माण झाले आहेत. महाळुंग नगर पंचायतीच्या निवडणुकीत माझा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही सहभाग नव्हता. तिकिट वाटपामध्येही सहभाग नव्हता. तरीही माझ्या विरोधात बातम्या छापून आल्या. त्यामुळे गैरसमज निर्माण झाले. त्याबरोबरच मी संजय शिंदेंना भेटलो, परिचारकांकडे गेलो. उत्तम जानकरांकडे चहा पितो, म्हणूनही माझ्या विरोधात बातम्या छापल्या गेल्या. शिंदे, परिचारक व जानकर हे माझे फार जुने मित्र आहेत. जानकरांनी मला गत निवडणुकीत मोठी मदत केली आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून मी या सर्वांना भेटत असतो. त्यात एवढे बाऊ करण्यासारखे काय आहे. आम्ही राजकीय विरोधक जरी असलो तरी मैत्रीचे संबंध फार जुने आहेत. राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. मला विखे पाटील म्हणाले की जानकरांचे चहाचे निमंत्रण आहे. जायचे का? त्यामुळे मी जायला तयार झालो. त्याचबरोबर अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मी विरोधकांना रसद पुरवल्याच्या बातम्याही प्रसिध्द झाल्या. काही कारण नसताना अशा बातम्या प्रसिध्द होत आहेत. माझ्यामुळेच जानकर निवडून आल्याचे आरोपही झाले. जर मी रसद पुरवठा केला असता तर विरोधकांचे सगळेच पॅनल का निवडुन आले नाही. जानकरांबरोबरच विरोधकांमधील अनेक मंडळी माझी मित्र आहेत.

आ. मोहिते-पाटील यांना मंत्रिपद मिळावे यासाठी मी सतत प्रयत्नशिल होतो, पक्षातील जेष्ठ नेत्यांकडे मी याबाबत आग्रहही करत होतो. मंत्रीपदाच्या राहिलेल्या बारा जणांच्या यादीत त्यांचे नाव यावे यासाठी मी प्रयत्न करत होतो. परंतु माळशिरस तालुक्यातून मला सतत विरोध केला गेला. माझ्याबद्दल अनेक गैरसमज पसरवले गेले. त्यामुळेच रणजितदादांचे मंत्रिपद रखडले गेले आहे. हे ही मी स्पष्टपणे मान्य करतो. एकतर्फी प्रसिध्द होणाऱ्या बातम्यांमुळेच आमच्यात गैरमज वाढले आहेत. माझ्या मनामध्ये आ. मोहिते-पाटील यांच्याबद्दल कोणतीही कटुता नाही, मतभेद नाहीत. आज जरी पक्षाने मला आ. रणजितसिंहांसाठी काम करण्यास सांगितले तर मी मोठ्या ताकदीने व प्रमाणिकपणे ते काम करेन.

कृष्णा भिमा स्थिरीकरणाविषयी बोलताना खा. नाईक निंबाळकर म्हणाले, स्थिरीकरणाच्या प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला आहे. परंतु हे प्रकरण लवादाकडे असल्याने प्रलंबित आहे. या खोऱ्यातील पाणी त्या खोऱ्यात घेता येणार नाही असा केंद्राने यापुर्वी नियम केला आहे. त्यामुळे कृष्णेचे पाणी कृष्णा खो-यासाठी व भीमेचे पाणी भिमा खोऱ्यासाठी वापरावे लागणार आहे. समांतर जलवाहीनीचीही सोलापूर जिल्ह्याला गरज नसल्याचे इरिगेशनच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.

मराठवाडा सिंचन प्रकल्प व नदीजोड प्रकल्प राबवल्यास या भागातील शेती व पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण होऊ शकते. मतदार संघातील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी मी ब्लू प्रिंट तयार केली आहे. मी खासदार झाल्यापासुन गत ३ वर्षात कॅनॉलला कधीही पाणी पुरवठा कमी होऊ दिला नाही. फलटण-पंढरपूर रेल्वेच्या कामाचे टेंडर येत्या एक ते दीड महिन्यात निघून कामे सुरू होतील. सुमारे २०० कोटी रूपयांचा निधी मी माळशिरस तालुक्यातील रस्त्यांसाठी दिला आहे.

मीच उमेदवार
२०२४ च्या माढा लोकसभा निवडणुकी विषयी बोलताना खा. नाईक निंबाळकर म्हणाले, पक्षाने मला लोकसभेची तयारी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे २०२४ साली होणाऱ्या या निवडणुकीमध्ये मीच माढा लोकसभेचा उमेदवार असणार आहे. तशी तयारीही मी आतापासूनच सुरू केली आहे.

आमचा उपमुख्यमंत्री पडणवीसांवर विश्वास
भाजपामध्ये प्रवेश करते वेळी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी देवेंद्र फडवणीस यांच्याकडून कृष्णा भिमा स्थिरीकरण विषयावर सहमती घेऊनच पक्ष प्रवेश केला होता. कृष्णा भिमा स्थिरीकरण होणारच असा शब्द आम्हाला फडवणीस साहेबांनी दिला आहे. त्यांच्या शब्दावर आमचा विश्वास आहे. अर्धवट ज्ञानावर कोणी काहीही बोलले तरी आम्हाला त्याचा परक पडत नाही.
धैर्यशील मोहिते-पाटील

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close