राजकिय

विठ्ठल परिवाराच्या एकीचे बळ सहकार शिरोमणीत मिळाले विजयाचे फळ

पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय व सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विठ्ठल परिवार प्रणित कल्याणराव काळे यांचे पॅनल विजयी झाल्याने विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील यांना बाजार समिती निवडणुकीनंतर हा आणखी धक्का मानला जात आहे. या निवडणुकीमुळे विठ्ठल परिवारातील मतभेद संपून एकोपा दिसून आला असून याचाच हा विजय मानला जात आहे.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर अभिजीत पाटील यांनी आपण सहकार शिरोमणीची निवडणूक लढवणार असे जाहीर केले होते त्याप्रमाणे त्यांनी डॉ. बी.पी. रोंगे व ॲडव्होकेट दीपक पवार यांना बरोबर घेऊन कल्याणराव काळे यांच्यासमोर आव्हान उभे केले होते या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच एवढी चुरस निर्माण झाली होती केवळ 11000 सभासद मतदानास पात्र असलेली ही संस्था असून तरीही कारखान्याची निवडणूक विधानसभेप्रमाणे पंढरपूर भागात घालत होती या निवडणुकीमध्ये अभिजीत पाटील यांनी बेरजेचे राजकारण करत ज्या संस्थेचे ते सभासदच नाहीत अशा ठिकाणी पॅनल लावण्याचे धाडस केले होते. तर पंढरपूरच्या राजकारणात मुरलेले कल्याणराव काळे यांनी कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने विठ्ठल परिवार एकत्र आणण्याचे काम केले. या निवडणुकीच्या निमित्ताने कल्याणराव काळे यांच्या व्यासपीठावर भगीरथ भालके युवराज पाटील गणेश पाटील याचबरोबर ठाकरे गटाची शिवसेना एकत्र आले होते.
या कारखान्याच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिजीत पाटील यांना पक्षात प्रवेश दिला तसेच या भागातील नेतृत्वही त्यांच्या हाती दिले यामुळे सहाजिकच भगीरथ भालके कल्याणराव काळे युवराज पाटील यांच्यामध्ये नाराजीचा सूर होता. अभिजीत पाटील यांनी कारखान्याचे चेअरमन पद स्वीकारल्यानंतर कधीही भालके, काळे व पाटील यांना जवळ केले नाही. कारखाना कार्यस्थळावर झालेल्या पवारांच्या सभेसही विठ्ठल परिवारातील या नेत्यांना निमंत्रण नव्हते याचाही राग परिवारातील या नेत्यांमध्ये होता यामुळेच ते सारे एक झाले व सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी अभिजीत पाटील यांच्या विरोधात जोरदार प्रचार करत कारखाना परत आपल्याच ताब्यात ठेवला.
विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीनंतर अभिजीत पाटील यांचे मनोबल उंचावले होते. यासाठीच त्यांनी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही मनसे व शेतकरी संघटनांना बरोबर घेऊन पॅनल लावले होते व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाला आव्हान दिले होते. मात्र त्या निवडणुकीत पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला बाजार समितीच्या निवडणुकीत काळे भालके यांनी तटस्थ राहून एक प्रकारे परिचारकांना मदत केली होती. यामुळे सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीत परिचारक गटाचे कार्यकर्ते काळे यांना सहकार्य करताना दिसत होते.
विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीनंतर पंढरपूर भागातील राजकारण बदलले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व अभिजीत पाटील यांच्याकडे गेल्याने त्यांनी साहजिकच येथील विरोधक असणारे प्रशांत परिचारक यांना आव्हान देण्यास सुरुवात केली आहे यामुळे आता येथील त्यांच्यामुळे अगोदर दुखावले गेलेले विठ्ठल परिवारातील नेते व परिचारक हे एकत्र येताना दिसत आहेत. अभिजीत पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याने भगीरथ भालके हे नाराज आहेत व त्यांनी अन्य पक्षात जाण्याचा निश्चय केला असावा असे दिसत आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी तेलंगणातील सत्ताधारी पक्ष बी आर एस चे प्रमुख तेथील मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली आहे. सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीत भालके व अभिजीत पाटील यांच्याकडून विधानसभेचा मुद्दा सतत उचलला गेला.या निवडणुकीच्या निमित्ताने भालके यांनी आपली भाषणाची आक्रमक शैली पुन्हा पंढरपूरच्या जनतेला दाखवून दिली.
सुरुवातीला एकतर्फी असणारी या कारखान्याची निवडणूक अभिजीत पाटील यांनी आक्रमक विहूरचना आखत चुरशीची बनवली मात्र सहकार शिरोमणी कारखान्याच्या सभासदांनी कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला व सुमारे 1800 मतांच्या फरकाने त्यांचे पॅनल विजयी केले या निवडणुकीमुळे पंढरपूरच्या राजकारणात विठ्ठल परिवार व त्यांची एकसंघता किती महत्त्वाची आहे हे पुन्हा दिसून आले आहे. तर दुसरीकडे काळे गट या कारखाना निवडणुकीमुळे पुन्हा मजबूत होण्यास मदत झाली आहे.काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी गेले महिनाभर प्रचार करून हा विजय मिळवला आहे.
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती पाठोपाठ सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीतही अभिजीत पाटील यांना पराभव सहन करावा लागत आहे त्यांनी या संस्थांमध्ये आपली ताकद नाही मतदार नाहीत अशा ठिकाणी पॅनल लावण्याचे धाडस केले. यामुळेच त्यांना या दोन संस्थांमध्ये विजय मिळवता आला नाही. पंढरपूरच्या सहकारात एकमेकांच्या संस्थांमध्ये येथील नेते लक्ष घालत नाहीत. मात्र अभिजीत पाटील यांनी हा पायंडा मोडून बाजार समिती पाठोपाठ सहकार शिरोमणीत आपले नशीब आजमावले मात्र त्यांना यश आले नाही.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close