विशेष

परिचारक विरोधकांना एकत्र आणणे ही सत्वपरीक्षाच

नगरपरिषदेत सत्तापरिवर्तन होवू शकेल? शहरात चर्चा रंगतेय

पंढरपूर नगरपरिषदेत यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत सत्तापरिवर्तन करून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या आघाडीला पराभूत करण्याचा चंग मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी बांधला असून त्यांनी सर्व परिचारक विरोधकांना एकत्र करण्यास सुरूवात केली आहे. मात्र येथील राजकीय पक्षांमध्ये असणारी गटबाजी पाहता त्यांना एकाच मंचावर आणणे ही सत्वपरीक्षा ठरू शकते. अद्याप निवडणुकीचे बिगूल वाजले नसले तरी शहरात सर्वांनीच तयारी सुरू केली आहे. स्व. आमदार भारतनाना भालके यांच्या नावाने परिवर्तन आघाडी स्थापन करण्यावर भर दिला जात आहे.
पंढरपूर शहराने मागील अनेक वर्षांपासून परिचारक गटावर विश्‍वास टाकला असला तरी यास अलिकडच्या काळात 2012 चा अपवाद होता. 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत आमदार भारत भालके यांनी विजय मिळविला होता तेंव्हा पंढरपूर शहरातही परिवर्तनाची लाट होती व 2012 मध्ये नगरपरिषदेच्या चाव्या भालके प्रणित तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडे गेल्या. अडीच वर्षातच परिचारक गटाने विरोधी तीन नगरसेवक फोडून पुन्हा सत्ता काबीज केली. 2016 ला झालेल्या नगरपरिषद निवडणुकीच्यावेळी राज्यात भाजपाचे सरकार होते. यातच प्रशांत परिचारक ही विधानपरिषदेवर निवडले गेले होते. यामुळे सहाजिकच जनतेने पुन्हा परिचारक आघाडीला पालिकेच्या सत्तेवर आणले.
स्व.आमदार भारत भालके यांचे निधन झाल्याने आता 2022 ला होणार्‍या नगरपरिषद निवडणुकीत परिचारक गटासमोर तगडे आव्हानं कोण उभे करणार? हा प्रश्‍न होता. विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांचा मतदारसंघात फारसा संपर्क नाही. त्यांच्या पत्नी डॉ. प्रणिता भालके याच सध्या गटाचे काम पाहात आहेत. अशा परिस्थितीत मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी शहरातील परिचारक विरोधकांना एकत्र आणून नगरपरिषदेची निवडणूक लढण्याचा चंग बांधला आहे. यासाठी त्यांनी परिचारक विरोधात लढणार्‍या आघाडीलाही स्व. भारत भालके यांचे नाव देण्याची घोषणा केली आहे. येथील मतदारांनी स्व.भारतनाना भालके यांच्यावर खूप विश्‍वास टाकला होता हे त्यांच्या तीन विधानसभा निवडणुकातही स्पष्ट झाले होते तर पोटनिवडणुकीत देखील भगीरथ भालके यांना एक लाखाहून अधिक मतं मिळाली होती. यात पंढरपूर शहराचाही वाटा मोठा होता. हे पाहता परिवर्तन आघाडीला स्व. आमदार भारत भालके यांचे नाव देण्याचा विचार झालेला दिसत आहे.
दरम्यान या आघाडीत भगीरथ भालके व राष्ट्रवादीचे अन्य गट सहभागी होणार का? याचे उत्तर ही लवकरच मिळेल. धोत्रे यांचे सर्व राजकीय पक्षातील स्थानिक नेत्यांची संबंध आहेत. याच बरोबर सतत स्वबळाचा नारा देणार्‍या काँगे्रसची भूमिका काय? असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शहरात शिवसेनेला मानणारा ही मतदार आहे. याच बरोबर स्थानिक पातळीवर अनेक मातब्बर गट असून त्यांची पालिका निवडणुकीत नेहमीच भूमिका महत्वाची ठरते, ते यावेळी काय निर्णय घेणार यावर ही बरेच अवलंबून आहे.
माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी या निवडणुकीत आमदार समाधान आवताडे यांना बरोबर घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी मागे जाहीर केले होते. यामुळे सहाजिकच भाजपाच्या परिचारक-आवताडे या प्रस्थापितांना आव्हानं देणे अन्य राजकीय पक्षांना सोपे नाही. यावेळी परिचारक त्यांच्या पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडीच्या नावाखाली निवडणूक लढविणार की भाजपाच्या चिन्हावर, यावरही बरेच काही अवलंबून आहे. कारण पोटनिवडणुकीत प्रथमच कमळ फुलले असून पक्षाकडून चिन्हावर निवडणूक लढविण्याचा आग्रह होवू शकतो.
नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वातावरण तापवले जात असून परिचारक गटाकडे इच्छुकांची मोठी संख्या आहे. गेले साडेसात वर्षे ज्यांच्याकडे नगराध्यक्षपद आहे त्या साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांची भूमिका या निवडणुकीत महत्वाची असणार आहे. ते परिचारकांबरोबर काम करत असले तरी येथील राजकारणात त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. ते पंढरपूर मर्चंट बँकेचे अध्यक्ष असून त्यांचे शहरात राजकीय वजन आहे.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close