विशेष

पायी आषाढी वारी न करण्याच्या निर्णयावर शासन ठाम राहिले, गतवर्षीच्या तुलनेत काही सवलती वाढवून समन्वयाचा प्रयत्न


पंढरपूर- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सर्वाधिक फटका बसल्याने राज्य सरकार अनेक खबरदारीचे उपाय सतत योजत असून याच अंतर्गत आषाढीची पायी वारी करण्यास याही वर्षी मज्जाव करण्यात आला आहे. बसमधून मानाच्या दहा पालख्या पंढरपूरला नेण्यास परवानगी दिली असून जवळपास 20 नियम असलेला या यात्रेबाबतचा आदेश आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केला आहे.
आषाढीची पायी वारी मोजक्या भाविकांसमवेत करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी वारकरी संप्रदायाने केली होती. मात्र शासनाने अगोदरच यास नकार दिला होता. यानंतर निर्णयाचा  फेरविचार करण्याची विनंती काही संस्थांनाच्या वतीने झाली मात्र शासनाने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत झालेली स्थिती व तिसर्‍या लाटेची शक्यता पाहता मागील वर्षीपेक्षा काही सवलती देत पायी वारीस मात्र परवानगी नाकारली आहे.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत महाराष्ट्राला मोठा फटका बसला असल्याने शासन ताक ही फुकूंन पीत आहे. यासाठीच याही वर्षी पायी वारीस परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र गतवर्षीपेक्षा वारकर्‍यांना काही सवलती यात देवू केल्या आहेत. पालख्या आता पौर्णिमेपर्यंत पंढपूरला राहतील तसेच वाखरीपासून पालख्या पायी वारी करू शकणार आहेत. पालख्यासमवेत भाविकांची संख्या वाढविण्यात आली आहे. परंपरा टिकविण्याचा प्रयत्न शासनाने केलेला दिसत आहे.  
यंदा कोरोनाच्या लाटेत ग्रामीण भागात जास्त फटका बसल्याने पालखी मार्गावरील शहर व गावांनी यंदाही पायी वारी नको असा आग्रह धरला होता. याबाबतची निवेदन दिली होती. अद्यापही सोलापूर जिल्ह्यात पालखी मार्गावरील माळशिरस व पंढरपूर तालुक्यात रूग्ण आढळून येतच आहेत. सोमवार 14 जून रोजी माळशिरस तालुक्यात 71 तर पंढरपूर तालुक्यात 80 कोरोना रूग्णांची नोंद आहे.
शासनाने आषाढी 2021 ची नियमावली जाहीर केली असून यात वीस मुद्द्यांचा समावेश आहे. आषाढी एकादशी दिवशी 20 जुलैला 195 वारकरी महाराज मंडळींना श्री विठ्ठल रखुमाईचे मुखदर्शन घेता येणार असून याच्या प्रवेशपत्रिक मंदिरे समितीच्या वतीने दिल्या जातील. दरम्यान दहा मानाच्या पालख्या बसनेच आपआपल्या मूळ ठिकाणावरून पंढरपूरला जाणार आहे. प्रत्येक पालखी सोहळ्यांना दोन बसेस शासन देणार असून प्रत्येक बसमध्ये 20 असे चाळीस भाविकांना एका पालखी सोबत परवानगी देण्यात आली आहे.
देहू व आळंदीतून निघणार्‍या संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यांच्या प्रस्थानावेळी 100 भाविकांना उपस्थित राहता येईल तर अन्य आठ मानाच्या पालख्यांच्या प्रस्थानासाठी 50 भाविकांंना उपस्थित राहण्यास मान्यता देण्यात आली आहे. दिंड्यांना प्रातिनिधीक स्वरूपात प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल.
दशमीला पालखी सोहळे आपआपल्या ठिकाणाहून निघतील व वाखरी येथे बसने आल्यावर तेथून पंढरपूरकडे ते पायी जावू शकणार आहेत. यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पालखी सोहळे हे दशमीला पंढरपूरला येतील तर त्यांचा येथील मुक्काम हा पौर्णिमेपर्यंत असणार आहे. शासकीय महापूजा व देव-संतभेटीला मागील वर्षीप्रमाणेच मान्यता देण्यात आली आहे.
आषाढी काळात श्री विठ्ठल  व रूक्मिणी मातेचे नित्योपचार परंपरेनुसार सुरू राहणार असून यात्रा कालावधीत भाविकांना दर्शनासाठी मंदिर असणार आहे.  एकादशी दिवशी खासगीवाले यांच्याकडून आयोजित होणार्‍या रथोत्सवाला परवानगी देण्यात आली असून यात रथाऐवजी वाहनाचा वापर होईल व  यासाठी मानकरी व कर्मचारी मिळून 15 जणांना परवागनी देण्यात आली आहे.  पौर्णिमेचा गोपाळपूरचा काला होणार असून त्यावेळी मानाच्या प्रत्येक पालखी सोहळ्याला 10 भाविकांसह भजन व कीर्तन करता येईल. महाद्वार काला ही 10 भाविकांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर राखून व योग्य ती खबरदारी घेवून साजरा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
आषाढीची सांगता होताना करण्यात येणार्‍या प्रक्षाळपूजा समिती सदस्यांनी करण्यास मान्यता देण्यात आली असून यासाठी विठ्ठल व रखुमाईकडे प्रत्येकी पाचजण उपस्थित राहू शकतील तर दोन्हीकडे प्रत्येकी अकरा ब्राह्मणांना रूद्राभिषेक व पवनमान अभिषेक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शासनाने संतांच्या पादुकाभेटीसाठी मानाच्या पालख्यांमधील चाळीस वारकर्‍यांना परवानगी दिली आहे. मंदिरात नैवेद्यासाठी दशमी  ते पौर्णिमेदरम्यान सहा दिवस प्रत्येकी दोन व्यक्तींना मान्यता देण्यात आली आहे.
श्री विठ्ठल पादुकांच्या मिरवणुकीसाठी पंधरा व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. तर श्री संत भानुदास महाराज पुण्यतिथी उत्सव चार व्यक्तींच्या उपस्थितीत साजरा होईल. आषाढीत गुरूदास महाराज देगलूरकर यांच्या चक्री भजनाल पाच जणांच्या उपस्थितीत मान्यता देण्यात आली असून यासाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक असणार आहे. ह.भ.प. अंमळेनगर महाराज व कुकूरमुंडे महाराज यांच्यासोबत दर्शनावेळी प्रत्येकी दोनजणांना परवानगी देण्यात आली असून त्यांनाही वैद्यकीय तपासणी बंधनकारक आहे. संत नामदेव महाराज  समाधी सोहळा हा अकरा व्यक्तींच्या उपस्थितीत आरोग्यविषयक नियम पाळून साजरा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पौर्णिमेला संत एकनाथ महाराज काला करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याचे नियोजन समिती करेल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Header

Related Articles

Back to top button
Close
Close