सामाजिक

यात्रांवर उदरनिर्वाह करणारे अनेक पंढरपूरकर “नगरपरिषद कर” आणि “वीज बिलं” भरण्यासही असमर्थ


पंढरपूर –  अनेक पंढरपूरकर नागरिकांच्या उदरनिवार्हाचे साधन असणार्‍या यात्रा मागील सोळा महिन्यांपासून भरलेल्या नाहीत, उलट सततच्या लॉकडाऊनमुळे लहान मोठी दुकानं बंद राहतात. यामुळे कामगारांपुढे ही आर्थिक प्रश्‍न निर्माण झाल्याने आता नगरपरिषदेचा कर व वीज बिलं कशी भरायची? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे.
एरव्ही चार मोठ्या यात्रांसह, सण, उत्सव, सुट्टीच्या दिवशी पंढरीत मोठी गर्दी असायची. मात्र कोरोनामुळे हे सारे बंद झाले. मध्यंतरी काही दिवस श्री विठ्ठल रखुमाईचे मुखदर्शन सुरू होते मात्र यासाठी अगदी मोजक्याच भाविकांना ऑनलाइन बुकिंगद्वारे दर्शनाची सोय केली जायची. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत हे दर्शनही ठप्प झाले व पुन्हा देऊळ कुलूपबंद झाले. मुळात पंढरीचे अर्थकारण हे मंदिरावर अवलंबून आहे. येथील रिक्षा, टांगे व्यवसाय ठप्प आहे तर दुसरीकडे लहान लहान व्यापारी जे रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करायचे त्यांच्या हाताला काम नाही. मंदिर परिसरातील सर्वच प्रासादिक वस्तूंची दुकान आज ही नियम पाळून उघडी असली तरी भाविकच नाहीत. अगदी मोजके लोक पंढरीत येवून संत नामेदव पायरीचे दर्शन घेवून जात आहेत. यामुळे गेले अनेक महिने ठप्प असलेले व्यवसाय आता कसेबसे सुरू आहेत. दुकानात कामगार ठेवणे ही आता परवडत नसल्याने दुकानदारच सेवा देत आहेत.
प्रासादिक वस्तू, हार,फुले विके्रते, तुळशी माळा तयार करणारे, फिरते विके्रते  यासह गंध लावणार्‍यांच्या हाती ही येथे पैसा येत नाही आहे. यातच दुसर्‍या लाटेत राज्यात लॉकडाऊन होता त्यावेळी सारेच कडकडीत बंद होते. याकाळातील वीज बिल भरण्याचा तगादा आता वीज कंपनीकडून सुरू आहे. नोकरदारांच्या हाती पगार जरी उशिरा येत असला तरी तो मिळण्याची खात्री असल्याने ते आपले दैनंदिन व्यवहार पूर्ण करत आहेत मात्र लहान लहान व्यावसायिकांचे अर्थकारण सततच्या निर्बंधांमुळे कोलमडले आहे.
पंढरीत भरणार्‍या आषाढी व कार्तिकी यात्रात शहराच्या गावभागात घरटी भाविक उतरतात व यातून त्या नागरिकांना उत्पन्न मिळते मात्र मागील सोळा महिन्यात यात्राच न भरल्याने उत्पन्न बुडाले आहे. यात्रा कालावधीत छोटे छोटे व्यवसाय करून नगरपरिषदेचे कर भरणारे अनेक नागरिक गावात आहेत. ते सारे व्यवसाय ठप्प आहे. येथील नगरपालिका मार्चचा कर यात्रानंतर भरण्याची सवलत नागरिकांना यासाठीच देते. आषाढीनंतर हमखास कर गोळा होतो. मात्र हा कर आणि वीज बिल भरणे जिकरीचे जात आहे. काही लोक सोने, चांदी मोडून आपला उदरनिर्वाह करत आहेत तर यातूनच बिलं ही चुकती करत आहेत.
केवळ लहान व्यावसायिकांची व कामगारांची अवस्था अशी आहे  असे नाही तर मोठे व्यापारी ही या काळात पिचले गेले आहते. त्यांना आपली स्थिती सांगताही येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील भाविकांवर अवलंबून असलेला हॉटेल व्यवसाय तर ठप्पच आहे. केवळ काही कामगारांना ठेवूनच कसाबसा हा गाडा ओढला जात आहे. वेळेचे बंधन व सततच्या बंदमुळे पंढरीची आर्थिक तब्बेत बिघडली असून यासाठी आता काही तरी उपाय योजणे आवश्यक बनले आहे.  

Header

Related Articles

Back to top button
Close
Close