घोषणा झालेला पंढरपूर- मंगळवेढा- विजापूर रेल्वे मार्ग प्रत्यक्षात उतरवा, महाराष्ट्र- कर्नाटक नव्या मार्गाने जोडण्याचे केंद्र सरकारला साकडे
पंढरपूर – 2013-14 च्या रेल्वे अंदाजपत्रकाच्या वेळी तत्कालीन रेल्वेमंत्री श्री बन्सल यांनी ज्या पंढरपूर- मंगळवेढा- विजापूर या रेल्वे मार्गाची घोषणा केली होती. तो प्रकल्प रेल्वे बोर्डाने 2018 मध्ये बाजूला ठेवला आहे यास मान्यता देवून महाराष्ट्र व कर्नाटकला जोडणार्या या टॅ्रकचे काम पूर्ण करावे , असे साकडे केंद्र सरकारकडे आमदार समाधान आवताडे यांनी घातले आहे.
आवताडे हे नवी दिल्लीत असून त्यांनी येथील कामांबाबत अनेक केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली असून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदनही देवू केले आहे. सांगोला- मंगळवेढा- सोलापूर या नवीन मार्गाबरोबरच यापूर्वी घोषित झालेल्या पंढरपूर- मंगळवेढा- विजापूर या मार्गाचा ही विचार व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यामुळे दोन राज्यातील वारकर्यांची सोय होणार असून मंगळवेढा तालुका हा रेल्वे नकाशात येईल तसेच कर्नाटकात जाण्याचा जवळचा रेल्वे मार्ग तयार होवू शकतो. सध्या पंढरपूरहून विजापूरला जायचे असेल तर कुर्डूवाडी, सोलापूर व विजापूर असे 245 किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. मात्र जर पंढरपूर ते विजापूर व्हाया मंगळवेढा व मरवडे असा रेल्वे मार्ग केला तर तब्बल 110 किलोमीटरचे अंतर कमी होण्यास मदत होवू शकते. यामुळे भाविकांचा वेळ व पैसा दोन्ही वाचू शकणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने याचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले होते. यानंतर 25 मे 2018 मध्ये याबाबतचा अहवाल रेल्वे बोर्डाला प्राप्त झाला व त्यांनी 6 ऑगस्ट 2018 मध्ये ही योजना बाजूला ठेवण्यास सांगितले आहे. दरम्यान कर्नाटक व दक्षिण काशी जोडणारा हा मार्ग महत्वपूर्ण असून याचे काम करावे अशी मागणी आमदार आवताडे यांनी केंद्र सरकारकडे आग्रहाने केली आहे. याचे सर्व्हेक्षण हुबळी रेल्वे विभागाने पूर्ण केले आहे.