दादा, मामा, बापू , भाऊंच्या साक्षीने खा. निंबाळकरांचा अर्ज दाखल
सोलापूर – माढा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी मंगळवार 16 एप्रिल रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे, अपक्ष आमदार संजयमामा शिंदे , शिंदे गट शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील व भाजपचे आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते. माढा मतदारसंघात निंबाळकर यांची भिस्त आमदारद्वय शिंदे बंधूंवर आहे. तर सांगोल्यामधून आमदार शहाजीबापू पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांच्यामुळे मताधिक्य मिळेल, असा भाजपाला विश्वास आहे. याचबरोबर माण, खटाव, फलटण भागामध्ये आमदार जयकुमार गोरे तसेच निंबाळकर यांची ताकद आहे.
माढा मतदारसंघांमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंड करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने निंबाळकर यांच्यासमोर आता कडवे आव्हान निर्माण झाले आहे.
दरम्यान भारतीय जनता पक्षाने सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मंगळवारी मोठ्या शक्तीप्रदर्शनाने दाखल केले आहेत. आयोजित रॅलीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर मध्ये दाखल झाले आहेत.
(43-माढा लोकसभा मतदारसंघासाठी रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.)