रॅलीत सातपुतेंच्या एका बाजूला उमेश पाटील तर दुसऱ्या बाजूला राजन पाटील, उमेदवारी अर्ज केला दाखल
सोलापूर – सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी मंगळवार 16 एप्रिल रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या समवेत माजी मंत्री सुभाष देशमुख ,मोहोळ चे माजी आमदार राजन पाटील उपस्थित होते.
दरम्यान भारतीय जनता पक्षाने सोलापुरात काढल्या रॅलीमध्ये राम सातपुते यांच्या एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील तर दुसऱ्या बाजूला उमेश पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे माजी आमदार राजन पाटील उपस्थित होते. राम सातपुते यांच्या या रॅलीमुळे हे दोन पाटील प्रचार रथावर एकत्र दिसून आले. मोहोळच्या राजकारणामध्ये उमेश पाटील व माजी आमदार राजन पाटील हे एकाच पक्षात काम करत असले तरी त्यांच्यामध्ये राजकीय संघर्ष आहे. उमेश पाटील यांनी आजवर राजन पाटील यांच्यावर अनेकदा प्रखर टीका केलेली आहे. मात्र भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीमध्ये पक्षाचा आदेश असल्याने हे दोन्हीही पाटील एकत्र आल्याचे चित्र होते.
राम सातपुते हे भाजपचे माळशिरसचे आमदार आहेत मात्र त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उतरवले आहे गेल्या दहा पंधरा दिवसापासून ते या भागामध्ये जोरदार प्रचार करत आहेत मंगळवारी त्यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांच्या रॅलीसाठी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरला आले आहेत रॅलीमध्ये आमदार विजयकुमार देशमुख जिल्हाध्यक्ष आ.सचिन कल्याणशेट्टी, क्लस्टर प्रमुख प्रशांत परिचारक यांच्यासह सोलापूर ,अक्कलकोट ,मंगळवेढा, मोहोळ या भागातील अनेक नेते उपस्थित आहेत. सकाळी हेलिपॅडवर देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले.
(42-सोलापूर (अ. जा.) लोकसभा मतदारसंघासाठी श्री. राम सातपुते यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे आज उमेदवारी अर्ज दाखल केला.)