मुंबई- हैद्रबाद बुलेट ट्रेन : मार्गावरील जागाबाधितांशी चर्चा करण्यासाठी जनसुनावणीला सुरूवात, पहिली बैठक आज ठाण्यात
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्यातून धावणार्या मुंबई- हैद्राबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम आता सुरू झाले असून विविध सर्व्हेक्षण यासाठी पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान ज्या ठाणे जिल्ह्यातून ही रेल्वे धावणार आहे तेथील जागा बाधितांची भूमिका जाणून घेण्यासाठी सोमवार 27 सप्टेंबरला बैठक होत आहे.
बुलेट ट्रेन देशातील विविध भागातून धावाव्यात यासाठी केंद्रातील मोदी सरकारने हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनच्या माध्यमातून मार्ग निश्चित केले आहेत. यात मुंबई- हैद्राबाद या 650 किलोमीटर मार्गाच्या प्रकल्पाचा समावेश असून मुंबई बीकेसी , ठाणे, पुणे ,सोलापूर, गुलबर्गा या भागातून ही बुलेट ट्रेन धावणार असून यात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, उत्तर व दक्षिण सोलापूर यासह अक्कलकोट तालुक्यातील गावांचा समावेश आहे.
यासाठी विविध सर्व्हेक्षण पार पडली असून नुकतेच सामाजिक सर्व्हेक्षण हाती घेण्यात आले होते. सर्व माहिती गोळा करण्यात आली असून हवाई सर्व्हे ही घेण्यात आला आहे. आता ज्या जिल्ह्यातून ही रेल्वे धावणार आहे तेथील स्थानिक व संभाव्य बाधित लोकांशी चर्चा करण्याची प्रक्रिया ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सुरू करण्यात आली आहे. ही बुलेट ट्रेन मुंबई, ठाणे, कामशेत, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा आणि हैद्राबाद या शहरांना जोडली जाणार असून यामुळे मुंबई, पुणे व हैद्रबाद या औद्योगिक व आयटी क्षेत्र असणार्या महानगरांबरोबरच मध्ये असणार्या अन्य लहान शहरांना याचा फायदा होईल. हा प्रकल्प राबविण्यासाठी सामाजिक, पर्यावरण सर्व्हेक्षण झाले आहे.
या मार्गावरील बाधित होणार्या जागाधारकांना या प्रकल्पाची जास्तीत जास्त माहिती मिळावी यासाठी त्यांच्या सल्लासमलत करण्यासाठी आता या मार्गावर बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे व याचाच एक भाग म्हणून ठाण्यापासून याची सोमवारी सुरूवात होत आहे. या प्रकल्पाबाबत जनजागृती व्हावी हा यामागचा हेतून असून या प्रकल्पात बाधित होणार्या जागांचा मोबदला दिला जाणार आहे. तो किती असणार याकडे सार्यांचे लक्ष आहे. आगामी काळात आता पुणे, सोलापूर जिल्ह्यातही याबाबतच्या बैठका घेतल्या जातील.