विशेष

पालखी सोहळे पंढरपूरमध्ये दाखल, उत्साहात स्वागत, गुरुवारी एकादशीचा महासोहळा

पंढरपूर – महाराष्ट्रासह इतर राज्यातून आलेल्या सुमारे ९ लाख वैष्णवांना घेवून संतांच्या पालख्या आज दुपारी भोजनानंतर वाखरीचा निरोप घेवून शेवटच्या पंढरपूर मुक्कामासाठी मार्गस्थ झाल्या. वाखरी तळावर संतांच्या दर्शनासाठी लाखो वैष्णवांनी गर्दी केली होती.
प्रत्येकाला विठूरायाच्या दर्शनाची ओढ लागली होती. दुपारी १ वाजता या मानाच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. वाखरी ते पंढरपूर हा भक्तीमार्ग टाळ, मृदुंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात दुमदुमून गेला होता. पंढरपूर हाकेच्या अंतरावर राहिल्याने वारकर्‍यांमध्ये उत्साह संचारला होता.
श्री संत सोपानकाकांचा पालखी सोहळा दुपारी एक वाजता , संत तुकाराम महाराजांचा दिड वाजता तर संत ज्ञानेश्वर माऊलींचा दोन वाजता पंढरीकडे मार्गस्थ झाला. विसावा पादुका मंदिराजवळ संत निवृत्तीनाथ , संत एकनाथ व संत मुक्ताबाई यांचे पालखी सोहळे येवून दाखल झाले होते . या संतांना माहेरी पंढरीस घेवून जाण्यासाठी श्री पांडुरंगाचा निरोप घेवून संत नामदेवराय येवून पोहोचले होते . सायंकाळी ४ वाजता एकनाथ महाराज यांचे इसबावी येथे उभे रिंगण पार पडले तर सायंकाळी ६ वाजता संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात पार पडले. सर्वात शेवटी दुपारी दोन वाजता वाखरीहून निघालेला श्री संत ज्ञानराजांचा पालखी सोहळा वाखरीचा ओढा पार करून पुरंदरे मळ्याजवळ पोहोचला. येथे माऊलींची पालखी मुख्य रथातून उतरवून ती भाटेच्या रथात ठेवण्यात आली. हा रथ ओढण्याचा मान परंपरेप्रमाणे वडार समाजाला असल्याने या समाजातील बांधवांनी हा रथ ओढत इसबावी येथील पादुका मंदिरापर्यंत आणला. सायंकाळी ६ ..३० वाजता हा सोहळा इसबावी येथे पोहोचला. यावेळी हजारो भाविकांनी खारीक, बुक्याची मुक्तपणे उधळण करीत माऊलींचे दर्शन घेतले. पंढरी समीप आल्याने दिंड्या दिंड्यामध्ये टाळ, मृदुंगाच्या साथीने भजनात रंग भरला जात होता तर काही दिंड्यात विविध खेळ खेळले जात होते. इसबावी येथे पंढरपूर नगरपालिकेच्यावतीने सर्व संतांच्या पालखी सोहळ्यांचे मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण माऊली माऊली नामाच्या जयघोषात पार पडले. हे रिंगण पाहण्यासाठी लाखो भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.
आरतीनंतर श्री ज्ञानराजांच्या पादुका श्रीमंत ऊर्जीतसिंह शितोळे सरकार यांच्या गळ्यात घालण्यात आल्या. उजव्या हाताला वासकर तर डाव्या हाताला सोहळ्याचे मालक आरफळकर यांना घेवून शितोळे सरकार श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीकडे मार्गस्थ झाले. शितोळे सरकार यांच्या गळ्यात पादुका दिल्यानंतर त्यांचे रूप अत्यंत मनमोहक व सुंदर दिसत होते.

आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा आषाढी पर्वकाळात पहाटे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रूक्णिीची शासकीय महापूजा होत आहे.संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालख्या सोहळ्यासमवेत तीन लाख, संत तुकाराम महाराजांसमवेत दोन लाख, संत निवृत्तीनाथ महाराजांसमवेत एक हजार, संत सोपानदेव महाराजांसमवेत एक लाख संत एकनाथ महाराजांसमवेत ५० हजार तर संत मुक्ताबाई, संत चांगावटेश्‍वर, संत चौरंगीनाथ , माता रुक्मिणी , गुलाबबाबा, संतनाथ महाराज, गवार शेठ लिंगायत वाणी (तुकाराम महाराजांचे टाळकरी), संत गोरोबा काका, संताजी जगनाडे महाराज, संत मच्छिंद्रनाथ, संत कानिफनाथ आदि संतांसमवेत जवळपास १ लाख असे सुमारे ९ लाख तर यंदा महिलांना एस टी प्रवासात ५० टक्के सवलत दिल्याने एस टी व रेल्वेने सुमारे दोन लाख असे सुमारे ११ लाख वैष्णव यंदा आषाढी वारीने पंढरीत दाखल झाले आहेत . पावसाने ओढ दिल्यामुळे या वैष्णवांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत असली तरी सर्वकाही करता करविता विठ्ठलच आहे . त्या विठ्ठलाचे चरणी नतमस्तक झाल्यावर ” अवघी चिंता वारेल ” असा वारकऱ्यांचा विश्वास असल्याने संपूर्ण संसाराचा भार त्या विठ्ठलावर टाकून तो मोठ्या आनंदाने व उत्साहाने आषाढी वारीसाठी पंढरीत दाखल झाला आहे .

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close