विशेष


दीड हजार कोटीचा पंढरपूर विकास आराखडा नागरिकांसाठी खुला

पंढरपूर- पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा स्थानिकांना पाहण्यासाठी तसेच सूचना करण्यासाठी शुक्रवार पासून पुढील चार दिवस खुला केला जाणार असल्याचे पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले होते. नागरिकांनी दिवसभर मागणी केल्यानंतर रात्री हा आराखडा खुला करण्यात आला. यामध्ये शहरातील विविध रस्त्यांसह मंदिर परिसरातील लहानसहान बोळांमध्ये रूंदिकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तर शहरात येणार्‍या भाविक व नागरिकांसाठी दीड हजार कोटी रूपयाच्या आराखड्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे.
पंढरपूर शहराचा व परिसराचा विकास करण्यासाठी सर्वकष आराखडा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरा पासून ते सोलापूर जिल्ह्यातील पालखीतळा पर्यंतचा दोन हजार कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान सदर आराखडा तयार करताना पंढरीतील श्री विठ्ठल मंदिरा नजिक असणारा परिसर मोठ्या प्रमाणात अधिग्रहीत केला जाणार असल्याची जोरदार चर्चा येथील नागरिक व व्यापार्‍यांमध्ये मध्ये होती. ती खरी ठरली आहे. प्रस्तावित आराखड्यानुसार पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत दोन प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
गुरूवारी सदर आराखड्याबाबत माहिती देण्यासाठी अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी संत तुकाराम भवन येथे बैठक घेतली. परंतु या बैठकीमध्ये देखील जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंदिर परिसरातील रूंदिकरणाचा विषय टाळला होता. यावरून नागरिकांनी व व्यापार्‍यांनी जोरदार गोंधळ घातल्यावर हा सर्वच आराखडा शुक्रवार पासून सोमवार पर्यंत सर्वांसाठी खुला करण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले. नगरपालिका, मंदिरातील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच व्हॉटसअ‍ॅप, इ मेल आदी सर्व ठिकाणी तो तुम्हाला पाहण्यास खुला केल्यावर पुन्हा सूचना मांडा असे सर्वांसमोर जाहीर करण्यात आले. परंतु आज दिवसभर यापैकी कोठेच आराखडा उपलब्ध नव्हता. अनेक नागरिकांनी मंदिराचे कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपालिका येथे हेलपाटे मारले, फोनवर चौकशी केली. परंतु अधिकार्‍यांनी याबाबत माहिती दिली नाही. रात्री उशीरा सदर आराखडा समाजमाध्यमावर पाठविण्यात आला.
दरम्यान पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाने पंढरपूर शहरातील नागरिक व येणार्‍या भाविकांसाठी मुलभूत सुविधांचा दीड हजार कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीसाठी निविदा प्रसिध्द केली आहे. दीड हजार कोटीचा आराखडा कसा असावा, यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा यासाठी सदर सल्लागार नियुक्त केला जाणार आहे. सदर निविदा प्रसिध्द झाल्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close