भिलारवाडी दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपीस पंढरपूर पोलिसांनी ऐन कार्तिकी यात्रेत पकडले
करमाळा, – तालुक्यातील भिलारवाडी येथे माय – लेकीच्या खून प्रकरणातील फरार संशयित आरोपी मयत महिलेचा पती अण्णा माने यास पंढरपूर येथे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस पथकाने पकडले आहे.
आठ नोव्हेंबरला पहाटेच्या वेळी उघड झालेल्या भिलारवाडी येथील खून घटनेत लक्ष्मी माने (वय ३५) आणि श्रृती माने (वय १२) या माय – लेकीचा मृत्यू झालेला होता. या प्रकरणी मयत महिलेचा भाऊ कमलेश चोपडे (रा. देवळाली, ता. करमाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अण्णा माने यांच्याविरोधात विरोधात करमाळा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला होता. दरम्यान घटनेनंतर संशयित अण्णा माने हा फरार झालेला होता. तेव्हापासून करमाळा पोलीस पथक त्याच्या मागावर होते.
दरम्यान कार्तिकी वारी सुरू असताना द्वादशी दिवशी मंगळवारी, सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराशेजारील संत तुकाराम भवन परिसरात माने असल्याची माहिती मिळाल्यावर पंढरपूर पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. या कारवाईत पंढरपूर येथील सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुलाणी, नाईक सुनिल जाधव, विनोद पाटील, महिला पोलीस पवार, घुमरे यांच्या पथकाने सहभाग घेतला.
अण्णा माने याला पकडण्यासाठी पोलीस प्रशासनकडून त्याचे छायाचित्र तसेच वर्णन असलेली माहिती आणि दुचाकीचा नंबर पोलिसांच्या व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये प्रसारित करण्यात आला होता. त्यानुसार पंढरपूर शहर पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मगदूम यांनी आपल्या पथकाला सतर्क केले होते. त्या पार्श्वभूमीवरच मानेची माहिती मिळून त्यास पकडण्यात यश आले. श्री विठ्ठल मंदिर परिसरात भाविकांची गर्दी असतानाही गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या सक्षम गोपनीय माहितीच्या स्त्रोतांमुळे संशयित अण्णा माने याची माहिती मिळाली. त्यानुसार गर्दीतही त्याला ओळखून शिताफीने ताब्यात घेण्यात यश आल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.