विशेष

पांडुरंग कारखान्याचा “सुपंत”ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित, कोविड काळात परिसरातील वैद्यकीय क्षेत्राला दिलासा


पंढरपूर – साखर कारखानदारी, उपपदार्थ निर्मितीत विविध यशस्वी प्रयोग यासह सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणार्‍या माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने सहकारी साखर कारखानदारीमधील पहिल्या स्किड माउंटेड ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी अवघ्या काही दिवसात केली असून त्यास सुपंत असे नावे देण्यात आले आहे. यातून ऑक्सिजन निर्मितीस सुरूवात झाली असून याचे उद्घाटन शुक्रवार 4 जून रोजी अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.
कोविड संकटाच्या काळात ऑक्सिजनची सर्वाधिक गरज या दुसर्‍या लाटेत जाणवली असून राज्यातील औद्योगिक कामाचा ऑक्सिजन देखील वैद्यकीय कारणास्तव वळविण्यात आला आहे. तरीही सुरूवातीला याची कमरता जाणवत होती. हे पाहता पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने ऑक्सिजन निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारी स्किड माउंटेड प्रणाली घेतली असून तैवान येथून हा प्रकल्प आणण्यात आला असून अवघ्या काही तासात याची उभारणी कारखानास्थळावर झाली आहे.
याबाबत बोलताना अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक म्हणाले, हा सहकारी कारखानदारीमधील स्किड माउंटिंग पध्दतीचा पहिला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प असून यासाठी 55 लाख रूपये खर्च आला आहे. पंंधरा दिवसापूर्वी याची मागणी आपण साई कंपनीच्या मार्फत नोंदविली होती. मात्र मध्यंतरी आलेल्या तौक्ते वादळामुळे जहाजातून हा प्रकल्प तैवानमधून आणण्यास उशिर होत होता. यामुळे अखेर विमानाने तो मागविण्यात आला व येथे येताच अवघ्या काही तासात कारखान्यावर याची उभारणी कंपनीने केली आहे. ऑक्सिजन वैद्यकीय कारणास्तव वापरण्यासाठी अत्यंत चांगला असल्याचा अहवाल देखील आला आहे. येथून रोज 90 ते 100 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर तयार होवू शकतील. याची क्षमता 25 क्युबिक मीटर इती आहे. यामुळे पंढरपूर व परिसरातील दवाखान्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करता येणे शक्य आहे.
दरम्यान पांडुरंग हा पहिला सहकारी साखर कारखाना आहे जो या पध्दतीने वैद्यकीय ऑक्सिजन निर्मितीत उतरला आहे. या साखर उद्योगाने यापूर्वी अनेक प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सहवीज निर्मिती देखील अनेक वर्षापूर्वी त्यांनी भाग घेतला व युनोचे कार्बन क्रेडिट घेणारा हा पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून नावाजला आहे.
या कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, ज्येष्ठ संचालक दिनकर मोरे, युटोपियन शुगर्सचे अध्यक्ष उमेश परिचारक , कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकणी उपस्थित होते. 

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close