विशेष

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ताकद वाढविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, म्हणूनच डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद


पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाला पुन्हा आपली ताकद वाढवायची असल्याने डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासारखे आक्रमक नेतृत्व त्यांनी पुढे केले असून त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. येथे भाजपाने मोठ्या प्रमाणात आपले बस्तान बसविले आहे. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात कमळाला वातावरण चांगले आहे. तर दुसरीकडे मागील वीस महिन्यापूर्वी पुन्हा सत्तेत आलेल्या राष्ट्रवादीला सोलापूर जिल्ह्यात आपले पुनर्वैभव प्राप्त करायचे आहे. यासाठी ते अनेकांना आपल्या गळाला लावत आहेत. अशा स्थितीत काँग्रेसची ताकद येथे म्हणावी तशी दिसत नाही. सारी भिस्त ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर आहे. यामुळेच आता ग्रामीण भागात जनाधार असणारे व युवक नेतृत्व जिल्हाध्यक्षपदी निवडण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतल्याचे दिसत आहे. सोलापूर महापालिका निवडणुका असल्याने तेथे आता सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना लक्ष द्यावे लागणार आहे. हे पाहता जिल्ह्यात डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासारख्या आक्रमक नेत्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देवून इतर नगरपरिषद, नगरपंचायती तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँगे्रसची ताकद वाढविण्याचा प्रयत्न हा प्रयत्न दिसत आहे.

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावर माळशिरस तालुक्याचाच हक्क अबाधित राहिला असून पानीवनंतर आता अकलूजने बाजी मारली आहे. जिल्हाध्यक्षपदी दिवंगत माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष निवडीबरोबरच प्रदेश सरचिटणीसपदी माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते तर उपाध्यक्षपदी माजी आमदार अ‍ॅड. रामहरी रूपनवर तसेच सचिवपदी माजी महापौर अलका राठोड, मनीष गडदे, किसन मेकाले गुरुजी, नरसिंह आसादे, पंडित सातपुते यांचीही निवड करण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव के. वेणुगोपाल यांच्या मान्यतेने प्रदेश काँग्रेचे अध्यक्ष नाना पटोले यांन सोलापूरसह राज्यातील 14 जिल्हाध्यक्षांची निवड केली.
सोलापूर जिल्हाध्यक्षपदासाठी डॉ. धवलसिंह यांच्याबरोबरच, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र यात डॉ.धवलसिंह यांनी बाजी मारली आहे. गेल्या सात महिन्यापूर्वीच डॉ. धवलसिंह यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. 

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close