अनलॉक की पुन्हा लॉकडाऊन.. दोन्हीही आपल्याच हाती
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मार्च 2020 पासून सुरू असून पंधरा महिने सार्यांना या न दिसणार्या विषाणूने वेठीस धरले आहे. आजवर सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले असून एक लाखाहून अधिक जण या राज्यात आजारात मृत्यूमुखी पडले आहेत. 55 लाख 43 हजार 267 जणांनी कोरोनावर मात केली असून जवळपास 1 लाख 85 हजार जण अद्याप उपचार घेत आहेत. या आजारामुळे देशाचे अर्थचक्र मंदावले आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रासारख्या औद्योगिकरण जास्त असणार्या राज्याला बसताना दिसतो. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसर्या वेळी जास्त फटका देशाला बसला आहे. मार्च 2021 मध्ये रूग्णसंख्या वाढू लागली होती. याचा वेग पाहता महाराष्ट्र सरकारने खबरदारीच्या उपाययोजना आखत तातडीने पावले उचलली. पुन्हा राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय झाला. यास काहींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र सरकारने व्यापक लोकहित लक्षात घेता 5 एप्रिल पासून निर्बंध कडक केले आणि याचा परिणाम आज दोन महिन्यांनी दिसून येत आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती सावरली गेली आहे. राज्य सरकारने स्थानिक प्रशासनांना पॉझिटिव्हिटी दर व ऑक्सिजन बेडची उपलब्धता पाहून निर्बंधात शिथिलता आणण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार सोमवार 7 जून पासून बर्याच भागात काही अटींसह अनलॉक करण्यात आले आहे.
पंधरा महिने ज्या विषाणूने थैमान घातले आहे तो अद्यापही पूर्णतः संपलेला नाही. अनेक रूग्ण अद्याप उपचार घेत आहेत. मात्र अर्थचक्रही थांबून चालणार नसल्याने दोन महिन्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने उघडली जात आहेत. याचा विचार आता नागरिकांनी करणे आवश्यक आहे. आवश्यक असल्यास बाहेर पडणे, दुकानांमध्ये गर्दी टाळणे, कोरोनाविषयक आरोग्य नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जगभराचा अनुभव पाहता कोरोनाच्या लाटा येत राहतात हे दिसून आले आहे. अनेक ठिकाणी याची तिसरी लाट ही येवून गेली आहे. भारतात देखील ती येईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तिला थोपवायचे हे आपल्याच हातात असून कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची दखल सार्यांनी घेतली पाहिजे.
सरकार अथवा प्रशासन जे निर्बंध कायम ठेवत आहे याचे पालन करावे व ज्यात शिथिलता दिली जात आहे तेथे सर्व नियम पाळल्यास कोरोनाला रोखणे शक्य आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण सापडले व मृत्यू ही झाले आहेत. देशाच्या कोरोनामुळेच्या एकूण मृत्यूपैकी 28 टक्के एकट्या महाराष्ट्रातील आहेत. हे राज्य औद्योगिकरणात अग्रेसर असून देशाच्या अर्थकारणाचा कणा आहे. मुंबईत ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आंतरराष्ट्रीय विमानांची सर्वाधिक ये-जा याच शहरातून होत असते. देशभरातील नागरिक कामाच्यास शोधात महाराष्ट्रात येतात. सार्यांना आपले करणारे हे राज्य असल्याने याचा सतत महाराष्ट्रात ये- जा करणार्यांची संख्या मोठी आहे. यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव ही येथे जास्त दिसून आला मात्र यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. दाट लोकवस्तीच्या मुंबईत कोरोनावर काबू करणे ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट आपण करून दाखविली आहे.
आता अर्थकारण पुन्हा सुरू होत असताना सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे तसेच लसीकरण करून घ्यावे. सध्या प्रशासन जे निर्णय घेत आहे यास सहकार्य करावे. राजकीय पक्ष व संघटनांनी विरोधासाठी विरोध म्हणून आणखी निर्बंध शिथील करण्याच्या अवास्तव मागण्या करू नयेत. कारण कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर धार्मिक स्थळे खुली करावीत तसेच विविध निर्बंध हटविण्यासाठी खूप आंदोलन झाली. यानंतर मंदिरांचे दरवाजे उघडले तसेच अनेक निर्बंध उठविले गेले. पाहता पाहता सर्व काही आलबल आहे अशी स्थिती निर्माण झाली. कोरोना कायमचा गेला अशी समजूत झाली. मात्र अवघ्या तीन चार महिन्याच पुन्हा कोरोनाच्या दुसर्या लाटेने अक्षरशः देशभरात थैमान घातले. देशातील रूग्णसंख्या दिवसाला चार लाखाच्या पुढे गेली होती. ऑक्सिजन कमरता निर्माण झाली. या आजारात मृत्यूमुखी पडणार्यांची संख्या झपाट्याने वाढली. मागील दीड दोन महिने विदारक चित्र सर्वत्र पाहावयास मिळाले. अनेक राज्यात निर्बंध लावण्यात आले व कोरोना नियंत्रणात आणला गेला आहे. आता पुन्हा अनलॉक सुरू होत असताना नागरिकांनी मागील दोन लाटेचा विचार करावा व तज्ज्ञ तिसर्या कोरोना लाटेचा देत असलेला इशारा गंभीरपणे घ्यावा व कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करून आपण व आपले कुटूंब सुरक्षित राहा. कारण जर अनलॉकमध्ये आम्ही पहिल्या लाटेप्रमाणेच कोरोना गेल्याचे समजून वर्तन करू तर पुन्हा लॉकडाऊनची स्थिती येण्यास वेळ लागणार नाही व ते आता परवडणारे नाही.