शरद पवार -बाळासाहेब थोरात यांची भेट नक्की कशासाठी ?
मुंबई– महाविकास आघाडी सरकारचे प्रवर्तक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व आघाडीचे सरचिटणीस काँगे्रसचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात सोमवारी मुंबईतील सिल्व्हर ओक या पवार यांच्या निवासस्थानी झालेली भेट ही राजकीय विश्लेषकांकडून महत्वाची मानली जात आहे.
चारच दिवसापूर्वी काँग्रेसच मातब्बर नेते तथा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी परस्पर राज्यात अनलॉकचा जाहीर केलेला निर्णय व यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत दिलेले स्पष्टीकरण यामुळे महाविकास आघाडीत ताळमेळ नसल्याचे स्पष्ट झाले होते. मुळात आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात व तेच असे निर्णय जाहीर करतात. मात्र वडेट्टीवार यांनी परस्पर पत्रकार परिषद घेवून कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने अनलॉक प्रक्रियेची माहिती समितीच्या बैठकीनंतर जाहीर केली. यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे नक्कीच नाराज झाले असणार हे निश्चित. यानंतर वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये जावून सारवासारव केली खरी तर राज्य सरकारने ही सोमवारपासून निर्बंध शिथील करण्याबाबतच्या गाईडलाईन जाहीर केल्या मात्र त्या ट्विटरवरून. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला संबोधित केले नाही. यापूर्वी ही तौक्ते वादळानंतर द्यावयाच्या मदतीचा आकडा वडेट्टीवार यांनीच जाहीर करून टाकला होता. वास्तविक पाहता कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. येथे मुख्यमंत्री ठाकरे यांचे विशेष लक्ष असते. मात्र वडेट्टीवर यांनी आपल्या विभागा अंतर्गत येणार्या या मदतीचा 252 कोटी रूपयांच्या मदतीची माहिती प्रसिध्दी माध्यमांना देवून टाकली होती.
दरम्यान यापूर्वीही काँगे्रसच्या काही मंत्र्यांच्या कुरबुरी झाल्या होत्या. वीज बिलाच्या प्रश्नावरूनही वाद होता. यानंतर काँगे्रसच्या प्रभारींनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेवून काँगे्रसच्या मंत्र्यांनी पक्षाकडे केलेल्या तक्रारी त्यांच्या कानावर घातल्या. काँग्रेस मंत्र्यांच्या विभागांना निधीची मागणी केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून काँगे्रस आक्रमक भूमिका घेत आहे. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पक्षाने आपली स्टॅटर्जी बदल्याचे चित्र आहे. यातच आता विधानसभेच्या नवीन सभापतींची निवड होणे आहे. हे पाहता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेब थोरात यांच्याशी याच विषयांवर चर्चा केली असावी असा अंदाज सारे व्यक्त करत आहेत. महाविकास आघाडीचे डॅमेल कंट्रोलर म्हणून पवार यांच्याकडे पाहिले जाते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शांत, सयंमी असले तरी ते कठोर निर्णय ही वेळोप्रसंगी घेतात हे आजवर दिसून आले आहे. त्यांनी निवडणूकपूर्व झालेली भाजपाबरोबरची युती निकालानंतर सत्ता येवूनही तोडून टाकली होती. याचा अनुभव असल्याने शिवसेनेला विनाकारण डिवचले जावू नये असा सल्ला कदाचित शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना बाळासाहेब थोरात यांच्यामार्फत ही दिला असावा अशी चर्चा आहे.
थोरात व पवार यांची भेट महामंडळाच्या वाटपावरून झाली असावी अशी माहिती काहींना सुत्रांनी दिली असल्याचे सांगितले जाते. मात्र हा विषय मुख्यमंत्र्यांसमोरच तीनही पक्षांचे नेत्यांच्या उपस्थितीत होवू शकतो. आजच्या पवार व थोरात यांच्या बैठकीत कदाचित यावर ही भाष्य झाले असेल. कारण नेते भेटल्यावर अनेक विषयांवर चर्चा रंगत असते. राज्यात महामंडळाचे समान वाटप व्हावे अशी मागणी काँगे्रसची अगोदरपासूनच आहे.