Uncategorizedविशेष

ऐन व्दादशीला भजन आंदोलन करत वारकरी संप्रदायाने नोंदविला पंढरपूर कॉरिडॉरला विरोध

पंढरपूर- टाळ मृदुंगाच्या साथीने व रामकृष्ण हरिचा जयघोष करीत शेकडो वारकर्‍यांसह महाराज मंडळींनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराला प्रदक्षिणा मारून प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉरला कडाडून विरोध दर्शविला. यावेळी महाराज मंडळींनी आमचा विकासाला विरोध नसून विनाशाला विरोध असल्याचे जाहीर केले.
वाराणसी, उज्जैन प्रमाणे तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे देखील कॉरिडॉर करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून या अंतर्गत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसरात ४०० फूट रूंद व ५१० फूट लांब रूंदीकरण सूचविण्यात आले आहे. यासह या परिसरातील १२ रस्त्यांचे रूंदीकरण देखील करण्यात येणार आहे. यामुळे अनेक मठ, ऐतिहासिक वाडे, मंदिरे बाधित होणार आहेत. याला स्थानिकांसह वारकरी, फडकरी, दिंडी प्रमुख व महाराज मंडळींनी विरोध दर्शविला आहे. यासाठी शासनाने प्रस्तावित कॉरिडॉर रद्द करावा या मागणीसाठी सोमवार व्दादशी दिवशी भजन आंदोलन केले. यावेळी महाव्दार चौक येथून टाळ, मृदुंगाचा गजर करीत प्रमुख महाराज मंडळी व शेकडो वारकर्‍यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराला प्रदक्षिणा मारली. यावेळी वारकर्‍यांनी संत नामदेव पायरी, पश्‍चिम व्दार, रूक्मिणी पटांगण येथे भजन आंदोलन केले. तर मंदिर परिसरात आलेल्या भाविकांना कॉरिडॉरला विरोध का याबाबतची माहिती पत्रके देखील वाटण्यात येत होती.
यावेळी वारकरी पाईक संघाचे अध्यक्ष राणा महाराज वासकर यांनी, वारकर्‍यांना विश्‍वासात न घेता हा आराखडा बनविण्यात आल्यामुळे निषेध करीत असल्याचे सांगितले. संत तुकाराम महाराज यांचे नाठाळाच्या माथी हाणू काठी असे वचन आहे. या संत वचना प्रमाणे आम्हाला वागण्यास भाग पाडू नका असा इशारा सरकारला दिला. विकासाच्या नावाखाली पंढरी भकास करणार असाल तर आम्ही आधी बुलडोजरच्या पुढे आडवे पडू या शब्दात कॉरिडॉरला विरोध दर्शविला.
विष्णू महाराज कबीर यांनी, यापूर्वी चंद्रभागेच्या वाळवंटात वारकरी, भजन कीर्तन करीत होते. न्यायालयाचा निर्णय या नावाखाली वारकर्‍यांना वाळवंटात राहण्यास बंदी करण्यात आली. वारी काळात केवळ चार दिवस भजनास परवानगी दिली जाते. आता विकासाच्या नावाखाली मंदिर परिसरातील आमचे मठ, वाडे पाडून काय साध्य करणार आहात असा प्रश्‍न उपस्थित केला.
ज्ञानेश्‍वर महाराज जोगदंड यांनी, वारकरी संप्रदायाचे विकासाबाबत एकमत आहे. शासनाने विकास करताना केवळ मंदिर परिसरच डोळ्या समोर ठेवू नये शहराच्या चारही बाजुला आता भाविक राहतात तेथे विकास करावा. तसेच जेथे विरोध आहे किंवा वादग‘स्त विषय आहेत, ते बाजुला ठेवून इतर विकासकामे हाती घ्यावीत अशी मागणी केली.
डॉ.महेश महाराज देहुकर यांनी, वारकरी संप्रदायाचा विकासाला विरोध नाही. परंतु काहीजण वारकर्‍यांचा विकासाला विरोध असल्याचा गैरसमज पसरवित आहेत. प्रस्तावित कॉरिडॉर करताना अनेक प्राचीन मठ, वाडे, मंदिरे बाधित होणार आहेत. मंदिरा नजिक असणार्‍या घराघरात हजारो वारकरी राहतात ती घरे उध्वस्त होणार आहेत. यामुळे सदर कॉरिडॉर शासनाच्या जागेत करावा अशी आमची मागणी असल्याचे स्पष्ठ केले. विकासाच्या नावाखाली वारंवार येथे रूंदीकरण करण्यास आमचा विरोध असल्याचे देहुकर महाराज यांनी जाहीर केले.
दरम्यान यावेळी तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी महाराज मंडळींचे निवेदन स्वीकारले. यावेळी  वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष संजय महाराज देहूकर, संत तुकाराम महाराज यांचे वंशज बापू महाराज मोरे, डॉ.महेश महाराज देहूकर, कान्होबा महाराज देहूकर, हरिप्रसाद महाराज देहूकर,  संत नामदेव महाराजांचे वंशज निवृत्ती महाराज नामदास, विठ्ठल महाराज नामदास, मुरारी महाराज नामदास, राणा महाराज वासकर, हरिभाऊ आजरेकर महाराज, विष्णु महाराज कबीर, भागवत महाराज चवरे, सुधाकर महाराज इंगळे, कृष्णा महाराज चवरे, विठ्ठल स्वामी महाराज वडगावकर, चैतन्य महाराज देहूकर, शाम महाराज उखळीकर, नागेश महाराज बागडे, रघुनाथ महाराज कबीर, विठ्ठल महाराज पैठणकर, विवेकानंद महाराज गोसावी, भागवत महाराज शिरवळकर, भगवान महाराज अलिबागकर, महेश महाराज भिवरे, महादेव महाराज यादव, भावार्थ महाराज नामदास, माधव महाराज बडवे, मयुर महाराज बडवे, मुरारी महाराज नाममदास, रामकृष्ण महाराज वीर, ज्ञानेश्वर महाराज जोगदंड आदींसह वारकरी उपस्थित होते.

वारकरी संप्रदायाच्या मागण्या वारकरी, महाराज मंडळी व स्थानिकांना विश्‍वासात घेवून आराखडा बनवला जावा, पंढरपूर शहरात स्वच्छतेच्या अनेक समस्या आहेत वाराणसीच्या धर्तीवर स्वच्छता केली जावी, कॉरिडॉर मुळे पंढरपूरची मुळ संस्कृती आणि हिंदू संस्कृती नष्ट होणार आहे. विकास आराखडा संस्कृतीचे संवर्धन करणारा असावा, वारकरी संप्रदायात भजन किर्तन करत असताना समोर अधिष्ठानाला महत्त्व आहे. कॉरिडॉरमुळे अनेक महत्त्वाचे सांप्रदायिक फड, मठ, संस्थाने, प्राचीन मंदिरे बाधित होणार आहेत, याची भरपाई पैश्यात किंवा इतर ठिकाणी जागा देवून होणार नाही. मंदिर परिसरात आजही हजारो भाविकांना अत्यल्प दरात राहण्याची सोय घरोघरी केली जाते. ही घरे पाडल्यास इतक्या भाविकांची राहण्याची सोय शासन करू शकणार नाही. यामुळे रूंदीकरणास विरोध, स्मशानभूमीजवळ दर्शन बांधणे चुकीचे असून छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात शासनाची चार-पाच एकर जागा उपलब्ध असताना इतक्या लांब दर्शन मंडप करू नये, सुलभ दर्शन व्यवस्थेसाठी टोकन पद्धती अवलंबली गेल्यास मंदिर परिसरात अनावश्यक गर्दीही होणार नाही. आहे हा मंडप पाडू नये, चंद्रभागेच्या वाळवंटातील वाळू चोरी बंद करावी नदी कायम स्वच्छ वाहती ठेवावी, पंढरपूर भकास करून विकास करण्यास तीव‘ विरोध.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close