केवळ परिचारक व्देषावर पंढरीत विरोधक तरतील?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काळात होत असून पंढरपूर शहरासह ग्रामीण भागात आता सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तालुक्याच्या राजकारणात सध्या माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाविरोधात अनेक नेते एकत्र आले आहेत. गेले अनेक वर्षे असे प्रयोग होत असले तरी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निकाल हे परिचारकांच्या बाजूने लागल्याचे चित्र आहे. सध्या परिचारक यांच्यावर टीका करण्याचा सपाटा विरोधकांनी लावला असला तरी यामुळे ते राजकीयदृष्ट्या तरतील का? हा मोठा प्रश्न आहे.
शहरात सध्या पंढरपूर विकास आराखडा, प्रस्तावित कॅरिडॉर यासारखे विषय गाजत आहेत. राज्यातील व केंद्रातील भाजपाचे सरकार हे हा आराखडा राबविण्यास अनुकूल असल्याने सहाजिकच याच पक्षात असणारे प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे हे सावध भूमिका घेताना दिसतात. पंढरपूर शहर हा परिचारकांचा बालेकिल्ला असल्याने सहाजिकच येथे त्यांचे विरोधक आक्रमक होत आहेत. परिचारकांनीही जनतेबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असला तरी विरोधकांनी मात्र त्यांच्यावर हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. मनसेचे नेते दिलीप धोत्रे हे यात आघाडीवर असून ते कोणताही विषय येथे निघाला की परिचारकांवर त्याचा ठपका ठेवून मोकळे होताना दिसतात. पंढरपूरचा आराखडा हा सत्ताधार्यांनीच केला असल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र मागील काही महिने पालिकेवर प्रशासक आहे, याकडे मात्र सोयीस्कर डोळेझाक केली जात आहे.
धोत्रे यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत परिचारकांविरोधात आघाडी उघडण्याचा चंग बांधला असून ते येथील अव्यवस्थेला परिचारक गटाचा कारभारच जबाबदार असल्याचा सतत उल्लेख करत आहेत. त्यांच्यासमवेत विठ्ठल परिवार ही सतत दिसतो. भगीरथ भालके यांनीही कॅरिडॉर विरोधी मोहिमेत सहभाग घेतला आहे. मात्र कल्याणराव काळे हे फारसे या प्रश्नी सक्रिय दिसत नाहीत. दरम्यान हा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत नेण्यात धोत्रे यशस्वी झाले असून त्यांनी येथील नागरिकांना कोल्हापूरमध्ये नेवून यावर चर्चा घडवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून परिचारकांना सर्वच आघाड्यांवर विरोधक एकत्र येवून टार्गेट करत असल्याचे भीमा कारखाना निवडणुकीतही दिसून आले आहे. यात अभिजित पाटील, भगीरथ भालके, कल्याणराव काळे, दिलीप धोत्रे यांनी खासदार धनंजय महाडिक यांना साथ दिली होती. याच निवडणुकीत आगामी काळात प्रशांत परिचारक यांना प्रत्येक निवडणुकीत खिंडीत गाठायचे .. असा निर्णय झाला आहे व यासाठी महाडिक ही परिचारक विरोधी आघाडीला साथ देणार आहेत. मात्र या आघाडीतील किती नेते आगामी काळात एकमेकांसोबत राहणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे भालके यांच्या सोबत जातील असे वाटत नाही. काळे व पाटील यांच्यात सहकार शिरोमणी कारखाना निवडणुकीवरून आत्तापासूनच वाद रंगत आहेत.
शहरातील विकासकामे, एमआयडीसी, कॅरिडॉर यासह विविध प्रश्नांवर परिचारकांवर केवळ टीका करून जनता विरोधकांना मतं देईल असे वाटत नाही. आजवरच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत परिचारकांचा वरचष्मा राहिला आहे. यातच परिचारक गट एकटा असून ही आपली ताकद अबाधित ठेवून आहे. त्यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे कट्टर आहेत. आता तर प्रशांत परिचारक यांनी कर्मवीर परिवाराचे नेते युवराज पाटील यांच्याशीही जुळवून घेतल्याचे चित्र आहे. विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीपासून युवराज पाटील यांनी स्वतंत्रपणे काम सुरू ठेवले आहे.
स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी पंढरपूर तालुक्यात केलेले काम, त्यांच्या ताब्यातील संस्थांचा चांगला कारभार, अनेक वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांवर असणारी पकड यामुळे शहर व तालुक्यात परिचारक गटाविषयी विश्वास निर्माण झालेला आहे. पंतांनंतर प्रशांत परिचारक यांनीही सर्व संस्था चांगल्या चालविल्या आहेत. तसेच त्यांना अनेक वर्षाचा जिल्ह्यातील राजकारणाचा अनुभव आहे. येत्या निवडणुकांमध्ये परिचारक हे आमदार समाधान आवताडे यांना बरोबर घेवून भाजपाच्या चिन्हावर निवडणुका लढवून विरोधकांना नमोहरम करण्याचा प्रयत्न करणार हेे निश्चित आहे. आवताडे यांच्याशी असलेले मतभेद ही अलिकडच्या काळात कमी झाल्याचे चित्र आहे. यामुळे केवळ परिचारक द्वेषावर विरोधकांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये यश कितपत मिळेल? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.