राज्य

मोठी बातमी : पावणे चौऱ्याहत्तर कोटींच्या श्री विठ्ठल मंदिर विकास आराखड्यास मान्यता, ही कामे निश्चित कालावधीत होणार !

 पंढरपूर दि. २- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुर या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यास राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून ७३ कोटी ८५ लाख ९५ हजाराच्या पंढरपूर देवस्थान मंदिर विकास आराखड्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. या निधीमुळे मंदिराचे प्राचीन सौंदर्य उजळून निघण्यास मदत होणार आहे. तसेच मंदिराचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे.

 तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यासाठी १९ जुलै २०१६ च्या शासन निर्णयातील आराखड्याची कमाल किंमत मर्यादा 25 कोटी ही अट शिथिल करून पंढरपूर देवस्थान मंदिर विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. पंढरपूर देवस्थान मंदिर विकास आराखड्याअंतर्गत कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांना संनियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. आराखड्यात प्रस्तावित असलेली कामे दोन टप्प्यात ३१ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

पंढरपूर देवस्थान मंदिर विकास आराखडा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी आवश्यक परवानगी घेणे, कामांना तांत्रिक मान्यता घेणे, कामांकरता निधी वितरण करणे आणि आराखड्याशी संबंधित शासनास सादर करायची विवरणपत्रे याची जबाबदारीही जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.

                   राज्य शासनाने मान्यता दिलेल्या ७३ कोटी ८५ लाख ९५ हजाराच्या पंढरपूर देवस्थान मंदिर विकास आराखड्यामध्ये मुख्य मंदिर व संकुलातील मंदिराचे जतन संवर्धन यामध्ये मुख्य विठ्ठल मंदिर (गर्भगृह, चारखांबी, सोळखांबी अर्ध मंडप इ.) साठी ५ कोटी ३ लाख ५८ हजार , रुक्मिणी मंदिर २ कोटी ७० लाख ५३ हजार,  नामदेव पायरी व त्यावरील इमारतीचे नूतनीकरण ५ कोटी ५ लाख ५१ हजार ९७४ रुपये, महाद्वार व दोन्ही बाजूच्या पडसाळी ६ कोटी १८ लाख २३ हजार , लाकडी सभामंडप १ कोटी २५ लाख ७२१ रुपये, महालक्ष्मी मंदिर, व्यंकटेश मंदिर व मंदिरातील इतर इमारती (बाजीराव पडसाळ, पश्चिम दरवाजा, तसेच मंदिरातील ३८ परिवार देवता, काशीविश्वेश्वर, शनेश्वर, खंडोबा, गणपती, राम मंदिर वगैरे) साठी ३ कोटी ६९ लाख ७ हजार आणि मंदिरातील दीपमालासाठी २२ लाख २७ हजार.

                देवस्थान अखत्यारीतील मुख्य मंदिर समूहाच्या बाहेरील २८ परिवार देवतांच्या मंदिरांचे जतन व संवर्धन साठी ११ कोटी २७ लाखाची तरतूद केली आहे. यामध्ये श्री विष्णुपद मंदिर, श्री डगरी वरील विष्णुपद मंदिर, श्री विष्णू मूर्ती मंदिर, श्री मारुती मंदिर, श्री नारद मंदिर, श्री मारुतीचा पार, श्री रिद्धी सिद्धी गणपती मंदिर, श्री लक्ष्मण पाटील मंदिर, श्री शनि काळभैरव मंदिर, श्री शाकंभरी मंदिर, श्री खंडोबा मंदिर,श्री सोमेश्वर मंदिर , श्री रेणुका माता मंदिर , श्री यमाई तुकाई मंदिर, श्री यल्लमा देवी मंदिर , श्री पद्मावती मंदिर, तहसील कचेरी समोरील श्री मारुती मंदिर, व्यापारी कमिटी मारुती मंदिर, श्री रामबागेतील मारुती मंदिर, श्री व्यास नारायण मंदिर, श्री अंबाबाई मंदिर, श्री लखुबाई मंदिर, श्री सटवाई मंदिर, श्री रोकडोबा मंदिर, श्री त्र्यंबकेश्वर व खंडोबा मंदिर, श्री नरसोबा मंदिर, श्री पुंडलिक मंदिरासमोरील समाधी आणि श्री काळा मारुती मंदिराचा समावेश आहे.

                     याबरोबरच विद्युत व्यवस्थापन ( आधीची विद्युत प्रणाली बदलून नवीन प्रणाली बसविणे, आपत्कालिन विद्युत पुरवठा, वायुवीजन तसेच आतील व बाहेरील भागातील दररोजची व उत्सवी प्रकाश योजना) साठी ५  कोटी ६७ लाख ११ हजार ९८० रुपये, जल व्यवस्थापनासाठी (पिण्याच्या तसेच वापराच्या पाण्याची व्यवस्था तसेच सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याची निचरा व्यवस्था) १ कोटी ५४ लाख ८ हजार, अभ्यागत सुविधेसाठी ६ कोटी ६८ लाख ९८ हजार ८७७ रुपये आणि मंदिरालगतच्या रस्त्याची दगडी फरसबंदी आणि सौंदर्यीकरण यासाठी ४ कोटी २० लाख  ७२ हजार ९६० रुपयांचा समावेश आहे. तर जीएसटी सह अन्य करांसाठी २० कोटी ३३ लाख ८१ हजाराची तरतूद केली आहे.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close