पंढरपूरच्या पोटनिवडणुकीपासूनच स्वाभिमानी आणि राष्ट्रवादीत वाद वाढलाच होता, यानंतरही टीका सहन न झाल्याने आमदार यादीतून नाव वगळण्याचा निर्णय!
पंढरपूर – भारतीय जनता पक्षाला शह देण्यासाठी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीचे पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी दोन्ही काँग्रेसच्या हातात हात दिला होता. यामुळे नव्या मैत्रीचे पर्व सुरू झाले खरे पण नंतर हळूहळू शेट्टी व महाविकास आघाडी सरकारमध्येही अंतर पडत गेले. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत स्वाभिमानीने उमेदवार दिला होता. यामुळे सहाजिकच पवार काका पुतणे यांना हे पटलेले नव्हते. यानंतर ही स्पष्ट बोलणारे म्हणून प्रसिध्द असणार्या शेट्टी यांनी पूरग्रस्तांच्या मदतीवरून सरकारमधील मंत्र्यांना घरचे आहेर दिले. आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून या सरकारने त्यांचे नाव कमी केल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आगामी काळात स्वाभिमानी विरूध्द राष्ट्रवादी असा शाब्दिक संघर्ष पुन्हा पाहायला मिळू शकतो.
महाविकास आघाडी सरकारमध्ये राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबतची यादी ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र दोन दिवसांपासून नेते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांची भेट घेवून त्यांना पत्र दिल्याचे सांगण्यात येते. यात शेट्टी यांच्याऐवजी राष्ट्रवादीने आता हेमंत टकले यांचे नाव दिले आहे.
दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकर्यांसाठी संघर्ष करणारे माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपली लढण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही कायम ठेवली आहे. त्यांनी वीज बिल असो की पूरग्रस्तांच्या मदतीचा प्रश्न यावर आवाज उठविला आहे. सध्या ते पूरग्रस्तांना मदतीच्या प्रश्नावर कोल्हापूर व सांगली भागात मोर्चे काढून आंदोलन करत आहेत. यावेळी त्यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवरच टीका होत आहे. यामुळे या भागातील राष्ट्रवादीमधील दिग्गज नेते ही नाराज आहेत.
मागील चार महिन्यापूर्वी झालेल्या पंढरपूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीतही शेट्टी यांनी येथे आपल्या पक्षाचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविला होता. आमदार कै. भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर महाविकास आघाडीने एकत्रितच लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादी यांनी एकजूट दाखवित भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली व भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची करत येथे जोरदार प्रचार केला आणि यात येथे प्रथमच भाजपाचे कमळ फुलले. ही पोटनिवडणूक महाविकास आघाडीची एकजूट दाखविण्यासाठी महत्वाची असताना ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येथे उमेदवार दिला व जोरदार प्रचार केला. यासाठी स्वतः राजू शेट्टी यांनी काही सभा घेतल्या होत्या. यामुळेच सहाजिकच ही जागा प्रतिष्ठेची केलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना येथील पराभव सहन झालेला नाही.
राजू शेट्टी यांचे महाविकास आघाडीबरोबर पटत नसल्याचे वारंवार दिसत आले आहे. यातूनच अंतर वाढत गेले आणि आता त्यांचे नाव राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या यादीतून काढण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला असल्याचे समजते.
याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले, प्रत्येकाची वेळ येत असते; एकाएकाचे हिशेब चुकते करायला मी समर्थ आहे. एकतर सध्या मी या पूरग्रस्तांच्या आंदोलनामध्ये आहे. स्वाभिमानी संघटनेसाठी किंवा पक्षासाठी विधानपरिषद हे काही आमचे साध्य नाही किंवा ते नाही मिळाले तर आम्ही किंवा आमच्यातील काही दहा-वीस लोक आत्महत्या करतील असे काही नाही. एक समझोता झाला होता लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीकडे एक जागा आणि काँग्रेसकडे एका जागा लोकसभेची आम्ही मागितलेली होती. काँग्रेसने सांगलीची जागा दिली, पण राष्ट्रवादीने लोकसभेच्या जागेच्या ऐवजी समजा त्यांची सत्ता नाही आली तरी देखील, महाराष्ट्राच्या विधानसभेत जी आमदार संख्या आहे त्यावरून, जी निवडली जाणारी विधानपरिषद आहे ती किंवा सत्ता आली तर राज्यपालांच्या कोट्यातून सरकारला जे काही 12 आमदार नेमता येतात, त्यातली एक जागा स्वाभिमानी पक्षाला द्यायचे शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मान्य केले होते.