पंढरपूर जिल्हा नको रे बाबा ! भविष्यात काही भाग बारामतीला जोडला जाण्याची भीती…?
सोलापूर- सोलापूर जिल्हा तोडून पंढरपूर जिल्हा करावा या ठरावाला आपली संमती नसून आपण यावर सही करणार नाही, अशी रोखठोक भूमिका जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांनी घेतली असून याचे सर्वत्र स्वागत होताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेची ऑनलाइन सभा घेण्यात आली. या सभेत सदस्य अॅड. सचिन देशमुख यांनी पंढरपूर जिल्हा करण्याचा विषयाचा प्रस्ताव मांडला होता. या विषयाला पंढरपूर तालुक्यातील कासेगाव गटाचे सदस्य वसंतराव देशमुख यांनी अनुमोदन दिले होते. पंढरपूर जिल्हा करण्याचा विषय सभेत घेण्यात आल्याने या विषयावरुन जिल्हाभरात चर्चा सुरू झाल्या होत्या. मंगळवारी 7 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, सोलापूर जिल्हा तोडला तर हा भाग भविष्यात बारामतीला जोडण्यात येईल. पंढरपूर जिल्हा हवाच कुणाला. उद्या सर्व तालुक्यातच विभाजनाची भावना निर्माण होईल. त्यामुळे या विषयाच्या मंजुरीवर अध्यक्ष म्हणून कदापि सही करणार नाही.
दरम्यान जिल्हा परिषदेच्या बैठकीत जेंव्हा पंढरपूर जिल्हा करण्याचा ठराव घेण्यात आला तेंव्हा सोलापूर जिल्ह्यात चर्चेला ऊत आला होता. अनेक जिल्ह्ये विभाजनाच्या प्रतीक्षेत असताना त्यांच्याहून लोकसंख्येने व क्षेत्रफळाने लहान असणार्या सोलापूर जिल्ह्याला तोडून पंढरपूर जिल्हा तयार करण्याच्या मागणीबाबत आश्चर्य व्यक्त होत होते. याबाबत या भागातील नेत्यांनीही कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. दरम्यान गेले काही दिवस पुणे जिल्ह्याचे विभाजन करून बारामती नवा जिल्हा तयार करण्याची चर्चा होती. यामुळे सीमावर्ती भागातील तालुक्यांचे याकडे सर्वाधिक जास्त लक्ष आहे. पंढरपूर जिल्हा करायचा असेल तर यासाठी सातारा व सांगली जिल्ह्यातील काही तालुके यात घ्यावे लागतात. दुसरीकडे याचवेळी जर बारामती जिल्ह्याची निर्मिती झाली तर सोलापूरचे सीमावर्ती तालुके ही त्या जिल्ह्याला जोडले जातील अशी शक्यता वर्तविली जाते.
यासाठी काल जिल्हा परिषद अध्यक्षांनीही बोलताना जर पंढरपूर जिल्हा झाला तर काही भाग भविष्यात बारामतीला जोडला जावू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे. यामुळे पंढरपूर जिल्ह्याच नको अशी भूमिका घेतली आहे.