काळजी घ्या : कर्नाटकात ओमिक्रॉन चे दोन रूग्ण आढळले
नवी दिल्ली – गेेल्या काही दिवसांपासून जगभरात ज्याची भीती बाळगली जात आहे त्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे दोन रूग्ण भारतातील कर्नाटक राज्यात आढळून आला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. हे रूग्ण 44 व 66 वर्षीय असून त्यांना कोरोनाची हलकी लक्षण दिसत आहेत. हे दोघे दक्षिण आफ्रिका देशातून परत आले आहेत.
सध्या जगभरातील 29 देशांमध्ये ओमिक्रॉन या व्हेरियंटचे 373 एकूण रूग्ण आढळून आले आहेत. दक्षिण आफ्रिकेत याचे रूग्ण आढळत असल्याची चर्चा होती. या नवीन व्हेरियंटमुळे जगभरात दक्षता बाळगली जात असून अनेक ठिकाणी कोरोना विषयक नियम कडक करण्यात आले आहेत. भारतात ही नियम पुन्हा कडक झाले आहेत. तसेच याबाबतची नियमावली नव्याने केंद्र व राज्य सरकारने जारी केली आहे. ओमिक्रॉन हा स्ट्रेन वेगाने फैलावतो तसेच तो डेल्टा पेक्षा घातक मानला जात आहे.
गुरूवार 2 डिसेंबर रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेवून कर्नाटकात दोन ओमिक्रॉनचे रूग्ण आढळून आल्याची पुष्टी केली आहे. या दोघांच्या संपर्कातील व्यक्तींच्याही चाचण्या केल्या जात असून आवश्यक त्या सर्व उपाय योजना केल्या जात असल्याचे स्पष्ट केले आहे. हे दोन्ही ऑमिक्रॉन संक्रमित रूग्णांची तब्बेत व्यवस्थित असून त्यांना हलकी लक्षण दिसत आहेत.
दरम्यान भारतात हा नवा व्हेरियंट सापडल्याने आता आरोग्य यंत्रणा आणखी सतर्क झाल्या आहेत. सध्या विमानतळांवर तसेच परदेशातून येणार्यांच्या चाचण्या होत आहेत. नागरिकांनी ही कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे.