सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार एकवटले , समिती स्थापन
पंढरपूर – ऊस तोडणी वाहतूक करणार्या वाहन मालकांची फसवणूक करणार्या मुकादम व मजुरांच्या अन्यायकारक वर्तनाला प्रतिबंध होऊन वाहन मालकांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्यावतीने एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या माध्यमातून इतर अडचणी व प्रश्नांबाबतही
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, साखर आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करून योग्य मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.
विठ्ठलराव शिंदे कारखान्यामध्ये जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक व शेतकी अधिकार्यांच्या बैठकीत शिंदे बोलत होते. दरम्यान यावेळी वरील प्रश्नावर साखर कारखानदारांची एक समिती स्थापन करण्यात आली. याच्या अध्यक्षपदी बबनराव शिंदे यांची
एकमताने निवड करण्यात आली.
याप्रसंगी सिध्देश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी, आमदार संजय शिंदे,
माजी आमदार राजन पाटील, सिद्धाराम म्हेत्रे, धनाजी साठे, उमेश परिचारक, कल्याणराव काळे, अभिजीत पाटील, सचिन देशमुख, व्ही.पी.पाटील, शिवाजीराव काळुंगे, सतीश जगताप, रोहित गर्ग, दादासाहेब साठे, दत्ता शिंदे, महेश देशमुख, शिवानंद पाटील, संजय आवताडे, साखर सहसंचालक पांडुरंग शेळके व
करमाळ्याचे पोलीस अधीक्षक विशाल हिरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना बबनराव शिंदे म्हणाले, मुकादम व ऊस तोडणी कामगारांनी वाहन मालकांची मागील एक वर्षात १०० कोटी रुपयांची फसवणूक केलेली आहे. साखर कारखाने वाहन मालकांबरोबर तोडणी, वाहतुकीचा करार करतात. त्यावेळी ते वाहन मालकास पाच ते सात लाख रुपये अगाऊ रक्कम देतात. वाहन मालक मजूर टोळी
मुकादमाबरोबर करार करून स्वतःचे जवळचे काही पैसे घालून मजूर टोळीबरोबर करार करतात. परंतु हे मुकादम ऐनवेळेस टोळी न आणता वाहन मालकांची फसवणूक करतात व यात शेतकरी विनाकारण भरडला जातो. यासाठी
मुकादमांच्या एकत्रित नोंदी साखर आयुक्तालयाकडे दिल्या पाहिजेत, सर्व व्यवहार ऑनलाइन व्हावेत, प्रत्येक ठिकाणी आरटीजीएस ने किंवा चेक ने पैसे दिले जावेत, तोडणी मजुराकडील आधार कार्डनुसार ज्या त्या ठिकाणच्या ग्रामसेवकांकडे नोंदी कराव्यात. वाहन मालकांच्या नुकसानीचा विचार होणे व या शेतकर्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे असे शिंदे म्हणाले.
याबाबतचे गुन्हे स्थानिक हद्दीतील पोलीस ठाण्यामध्ये केले पाहिजेत. कारण मुकादम व मजूर त्यांच्या गावी जाऊन वाहन मालकांवर ऍट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल करतात व या संदर्भात वाहन मालकांना तुरुंगवास भोगावा लागतो, प्रसंगी काही वाहन मालकांना जीव देखील गमावावा लागला आहे. या सर्व गंभीर बाबी संबंधात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झालीच पाहिजे व मार्ग शोधला पाहिजे असी मागणी आमदार शिंदे यांनी केली.
याप्रसंगी बोलताना धर्मराज काडादी म्हणाले की, संघटितपणे लढण्यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा आहे. परंतु स्व.गोपीनाथ मुंडे महामंडळाने एकतर्फी खर्चाचा निर्णय न घेता त्याचा शासन स्तरावरून विचार झाला पाहिजे. इथेनॉल, वीज निर्मिती संदर्भात कारखान्यांना येणार्या अडचणींबाबत शासनाने तत्परतेने सहकार्य करावे, सर्व वजन काटे ऑनलाइन जरूर करा पण ते कॉम्प्युटरला जोडू नयेत कारण त्याचा डेटा मिळणे अवघड जाते. याबाबत ही शासनाने विचार करावा अशी मागणी त्यांनी केली.
साखर सहसंचालक पांडुरंग शेळके म्हणाले, मजूर मुकादामांचे ऍप बनवण्यास मान्यता आहे. यासाठी एक मॉडेल ड्राफ्ट तयार करून मजूरतोडी ऐवजी मालक तोडीची सुरुवात करावी, प्रशासकीय विभागाकडून यासाठी सर्वतोपरी सहकार्य मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले. सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर व स्व.विठ्ठलभाऊंच्या प्रतिमेचे पूजन धर्मराज काडादी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मध्यप्रदेशात मजूर टोळी व मुकादमांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले प्रशांत भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
साखर कारखानदार समितीचे अध्यक्षपद आ. बबनराव शिंदे तर सदस्यपदी राजन पाटील, व्ही.बी.पाटील, रोहित गर्ग, महेश देशमुख, कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी, संतोष डिग्रजे व शेती अधिकारी व्यवहारे यांची निवड करण्यात आली. सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी केले तर आभार केन मॅनेजर संभाजी थेटे यांनी मानले.