Uncategorizedराजकिय

राजकारण : आमदार शिंदे बंधू लढवतायेत खा. निंबाळकर यांचा किल्ला


माढा लोकसभा मतदारसंघातील राजकारण 2019 च्या तुलनेत खूप बदलले असून मागील विरोधक आताचे मित्र बनले आहेत. या निवडणुकीत भाजपाने पुन्हा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर आमदारद्वय बबनदादा शिंदे व संजयमामा शिंदे यांनी त्यांना विजयी करण्याचा विडा उचलला आहे. हे दोघे आमदार बंधू बैठका व कार्यक्रम घेवून वातावरण निर्मिती करताना दिसत आहेत. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत माढ्यातून आ.बबनदादांचे सुपूत्र रणजित शिंदे यांना महायुतीच्या घटकपक्षांची सर्वतोपरी मदत मिळावी , यासाठी हे प्रयत्न असावेत, असे दिसत आहे.
2019 च्या निवडणुकीत खा. निंबाळकर यांना संजयमामा शिंदे यांनीच राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेत आव्हानं दिले होते. तर यंदा तेच आ. शिंदे निंबाळकरांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. उमेदवारी जाहीर होताच संजय शिंदे यांनी आपल्याच फार्म हाऊसवर महायुतीच्या आमदारांची बैठक घेतली होती. तर आता बबनराव शिंदे यांनी माढा तालुक्यातील पिंपळनेर येथे महायुती घटकपक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची बैठक घेत निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात महायुती सरकारमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी सहभागी झाल्यानंतर शिंदे बंंधू व निंबाळकर यांच्यातील दोस्ताना आणखी वाढला आहे. मानेगाव खैराव उपसा सिंचन योजना असेल की करमाळ्यातील कुकडीच्या पाण्या संदर्भातील प्रश्‍न असोत, हे निंबाळकर यांनी शासन दरबारी जावून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. कृष्णा फ्लड डायर्व्हशन प्रोजेक्टच्या पाहणी दरम्यानही शिंदे बंधू उपस्थित होते. अलिकडच्या काळात माढा व करमाळा मतदारसंघात निंबाळकर यांनी जास्त भेटी व कार्यक्रम घेतले.
जिल्ह्याच्या राजकारणात शिंदे व मोहिते पाटील यांचे जमत नाही. माढा लोकसभा मतदारसंघात ही खा. निंबाळकर व मोहिते पाटील यांच्यात वाद निर्माण झाला आहे. यामुळे सहाजिकच मोहिते पाटील विरोधक म्हणून निंबाळकर व शिंदे बंधू एकत्र आले आहेत. आता लोकसभा निवडणुकीत शिंदे निंबाळकर यांना ताकद देत आहेत. मागील निवडणुकीत शिंदे यांच्या विरोधात लढण्यासाठी निंबाळकर यांना मोहिते पाटील यांनी बळ दिले होते. आता चित्र पालटले आहे. यातच विधानसभा 2024 मध्ये माढ्यातून बबनराव शिंदे यांचे चिरंजीव दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे हे रिंगणात उतरतील, अशी चर्चा आहे. त्यावेळी मोहिते पाटील ही माढ्यात शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्न करणार हे निश्‍चित आहे. अशावेळी महायुतीची व त्यातल्या त्यात भाजपाची गरज शिंदे यांना भासणार आहे. त्यावेळी निंबाळकर हे शिंदे यांच्या मदतीला धावणार हे निश्‍चित आहे.
सध्या माढा लोकसभा मतदारसंघात निंबाळकर यांची मदार ही राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदे शिवसेनेवर जास्त असल्याचे दिसत आहे. या पक्षांचे तीनही आमदार आपआपल्या भागात खा. निंबाळकर यांच्यासाठी ताकदीने काम करताना दिसत आहेत.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close