अजितदादा आपल्या हक्काचे ! परिचारक-आवताडेंचे संचारबंदी कमी करण्याचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे
पंढरपूर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी यात्राही प्रतीकात्मक होत असून 17 ते 25 जुलै असे आठ दिवस पंढरपूर शहर व आजुबाजूच्या नऊ गावांमध्ये संचारबंदी पुकारण्यात आली असून याची घोषणा कालच प्रशासनाने केली आहे. दरम्यान येथील भाजपाचे दोन्ही आमदार प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांनी मंगळवारी विधीमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देवून संचारबंदीचा कालावधी कमी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान परिचारक व आवताडे यांचे पवार यांच्याशी पूर्वीपासूनच संबंध चांगलेच असल्याने या आमदारद्वयांनी हक्काने मुख्यमंत्र्यांऐवजी थेट उपमुख्यमंत्र्यांना साकडे घातल्याचे दिसत आहे.
अजितदादा पवार व प्रशांत परिचारक यांच्यातील संबंध हे सर्वश्रृत आहेत. आज जरी हे पक्ष वेगवेगळे असले तरी परिचारकांची कामे पवार थांबवत नाहीत अशी नेहमीच चर्चा असते. पक्ष सोडल्यानंतरही पवार कुटुंबाने परिचारकांना अंतर दिल्याचे दिसत नाही. स्व.सुधाकरपंत परिचारक यांचे निधन झाल्यानंतर सर्वात अगोदर खासदार शरद पवार पंढरपूरला आले होते. यानंतर पवार कुटुंबातील अनेकांनी सात्वंनासाठी प्रशांत परिचारक यांची भेट घेतली होती. अगदी विधानसभा पोटनिवडणुकीत ही राजेंद्र पवार हे परिचारक यांच्या वाड्यात आले व त्यांनी परिचारक बंधूंची भेट घेतली होती.
दरम्यान हा इतिहास एवढ्यासाठी महत्वाचा आहे की, पंढरपूरची संचारबंदी ही येथील कळीचा मुद्दा बनली असून आठ दिवस कडकडीत बंद राहणार असल्याने लहान मोठे व्यापारी नाराज आहेत व त्यांनी परिचारक व आवताडे या आमदारांना यावर तोडगा काढावा अशी मागणी केली आहे. प्रशासनाने तर संचारबंदीची घोषणा करून टाकली आहे. आता परिचारक व आवताडे यांनी विधीमंडळात अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून त्यांना निवेदन देवून यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तसेच येथील व्यापार्यांच्या व्यथा निवेदनातून प्रकट केल्या आहेत. दरम्यान आमदारांनी दिलेल्या निवेदनात 19 ते 21 दरम्यान संचारबंदी ठेवावी अशी मागणी केली आहे.
नुकतीच पंढरपूरची पोटनिवडणूक झाली असून अजित पवार यांनी दिलेला राष्ट्रवादीचा उमेदवार येथे पराभूत झाला असून भाजपाचे समाधान आवताडे आमदार झाले आहेत. यानंतर आता राजकारण संपले असून आता कामाचा हंगाम सुरू झाला असून अजितदादा यांना पुन्हा हक्काने येथील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी काम सांगताना दिसत आहेत. दादाही कधी कुणाची कामे थांबवत नाहीत व जनहिताचा विचार करून तातडीने निर्णय देतात हे ही सर्वांना ठाऊक आहे. यामुळे आता संचारबंदीबाबत काय होते हे लवकरच समजेल.