राज्य सरकार ऐकेना, अकलूज व नातेपुतेचे नागरिकही निघाले राज्यपालांकडे..
अकलूज – राजकीय कारणास्तव महाराष्ट्र सरकारने अकलूज-माळेवाडी नगरपरिषद व नातेपुते नगर पंचायतीची मंजुरी अडवून ठेवली असून यासंदर्भात आम्ही लवकरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार असल्याची माहिती भाजपाचे सोलापूर जिल्हा संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहीते पाटील यांनी दिली.
अकलूज व नातेपुते ग्रामपंचायतींचे रुपांतर नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये होण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. या कागदपत्रात कोणतीही अडचण अथवा कोणाचीही हरकत नसतानाही शासनाने याची मंजुरी का अडविली आहे असा सवाल मोहिते पाटील यांनी केला आहे. यापाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असून अकलूज नगरपरिषद झाल्यास 25, नातेपुते नगर पंचायत झाल्यास 19 नगरसेवक वाढणार आहेत. तर महाळुंग व माळशिरस नगरपंचायतीचे प्रत्येकी 19 असे एकूण 82 नगरसेवक या तालुक्यात होतील. त्याचा परिणाम येणार्या विधानपरिषद निवडणुकीवर होऊन राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत होऊन भाजपाचा येथे विजय होवू शकतो . हे टाळण्यासाठीच लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापोटी शासनाने मंजुरी अडविल्याचा आरोप त्यांनी केला.
याबाबत अकलूज, माळेवाडी व नातेपुतेचे नागरिक मागील पंधरा दिवसापासून साखळी उपोषणाला बसले आहेत. पण अद्याप शासनाच्या एकाही प्रतिनिधीने याची दखल घेतलेली नाही. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीही राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांच्या दबावाखाली असल्याने त्यांनीही या आंदोलनाकडे पाठ फिरविली आहे. यामुळे आता या तीनही गावचे नागरिक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेवून त्यांना आपल्या समस्या सांगणार आहेत.
आमदार निलंबन प्रकरणी प्रशासनास निवेदन
मराठा व ओबीसी आरक्षण, कोविड स्थिती, भ्रष्टाचार व इतर अनेक मुद्द्यांवर भाजपा आपल्याला या अधिवेशनात घेरणार असल्यामुळे महाविकास आघाडीने पावसाळी अधिवेशन दोनच दिवसात आटोपले आहे. भाजपाला नामोहरम करुन त्यांचे संख्याबळ कमी करण्यासाठीच काल विधानसभेमध्ये ठरवून गोंधळ घालण्यात आला. यात भाजपाच्या बारा आमदारांचे निलंबन करण्यात आले. हे एक राजकीय षडयंत्र आहे. याचा निषेध करत आमदारांचे निलंबन तत्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केल्याची माहिती धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली. निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले.