राज्य

विक्रमी आषाढी, दशमीपर्यंतच बारा लाख भाविकांच्या गर्दीचा अंदाज

  • पंढरपूर – राज्याच्या विविध भागात चांगला बरसलेला पाऊस व श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराला संवर्धन कामामुळे प्राप्त झालेल्या पुरातन स्वरूपाची उत्सुकता असल्याने यंदाची आषाढी यात्रा विक्रमी भरली असून दशमीपर्यंतच बारा लाख भाविक येथे दाखल झाले असावेत, असा अंदाज आहे. एकादशीपर्यंत हा आकडा आणखी वाढणार आहे.

    दशमी दिवशीच पंढरपूर शहरात भाविकांची मोठी गर्दी झाली असून मिळेल त्या ठिकाणी ते तंबू ,राहुट्या उभारून रहात आहेत. भक्तिसागर 65 एकरासह शहराच्या विविध रस्त्यांवर उभारण्यात आलेले पाच ठिकाणची मुक्काम ठिकाण भरली आहेत. यंदा यात्रा विक्रमी भरणार याचा अंदाज प्रशासनास आल्याने वारीची तयारी अगोदरपासूनच केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनीही तयारीचा आढावा पंढरपूरमध्ये येवून घेतला होता.

    दशमी दिवशी संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसह अन्य संतांच्या पालख्या व दिंड्या शहरात दाखल झाल्या आहेत. यामुळे गर्दी आणखीच वाढली आहे. सकाळी वाखरी येथे संतभेटीचा कार्यक्रम झाला. माउली व जगत्गुरूंच्या पालखी भेटीसाठी अन्य संतांच्या पालख्या वाखरीत आल्या होत्या. यानंतर सर्वच पालखी सोहळ्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. ठिकठिकाणी स्वागत केले जात होते. पंढरपूरकरांनी इसबावीजवळ पालख्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती.

    भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिरे समितीच्यावतीने दर्शनरांगेत जादाची पत्राशेड उभारण्यात आली असली तरी ती अपुरी पडत असून रांग गोपाळपूरपर्यंत गेली होती. हजारो भाविक रांगेत उभेत आहेत. यात्रेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. आठ हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी, होमगार्ड, विविध पथकं येथे तैनात आहेत. गर्दीच्या ठिकाणी जास्त बंदोबस्त असून सीसीटीव्ही यंत्रणा ही सज्ज आहे.

    दरम्यान आषाढी विक्रमी भरली असल्याने यंदा उलाढाल ही चांगला होणार हे निश्‍चित असल्याने व्यापारी वर्गानेही तयारी केली आहे. प्रासादिक सह विविध वस्तूंची दुकानं सजली आहेत. याचबरोबर शहरातील मठ भाविकांनी भरले असून उपनगरातील मैदानांमध्येही यात्रेकरू उतरले आहेत.

    आज पहाटे शासकीय महापूजा

    आषाढी एकादशीची शासकीय महापूजा बुधवारी एकादशी दिवशी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी सुरू होणार असून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. पहाटे मानाच्या वारकरी दांपत्यासह ते महापूजा करणार आहेत. दोन दिवस येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close