पंढरीत संचारबंदी नको, भालके-काळे यांचे ना. जयंत पाटील यांना साकडे ; जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णयाचे आश्वासन
पंढरपूर – दि.13 ऑगस्टपासून पंढरपूर शहरात संचारबंदी लागू होणार असल्याचे प्रशासनाने कळविल्याने येथील लहान मोठे व्यापारी आर्थिक संकटात सापडलेले आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांचेवर कर्जाचा बोजा पडलेला आहे. वास्तविक पाहता पंढरपूर शहरात कोरोना रुग्णसंख्या कमी आहे. त्यामुळे अशा ठिकाणी संचारबंदी करणे योग्य नाही अशा आशयाचे निवेदन पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी मुंबईत येथे प्रदेशाअध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचेशी समक्ष चर्चा करुन देण्यात आलेले आहे.
यावेळी त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी सोलापूर यांना पंढरपूर येथील व्यापारी यांना विश्वासात घेवून त्यांच्याशी चर्चा करुन येथील नागरीकांना न त्रास होता सकारात्मक मार्ग काढून योग्य तो तोडगा काढा अशा सूचना पाटील यांनी केल्या. . यावेळी श्री विठठलचे कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, शहराध्यक्ष सुधीर भोसले उपस्थित होते.
गेली एक-दीड वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे पंढरीच्या विठठलाची वारीच न भरल्याने वारीवर अवलंबुन असणाऱ्या पंढरपूर शहरातील छोटे मोठे व्यापारी यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. बऱ्याच दिवसापासून मंदिरे बंद असल्याने भाविकांची ये-जा थांबलेली आहे, त्यामुळे लहान मोठे व्यापारी, हॉटेल व्यवसायिक, फोटोवाले, मेवा मिठाई, हार-तूरे विकणारे तसेच रिक्षा व टांगेवाले यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. नुकतेच थोडे वातावरण चांगले झाल्याने येथील छोटे-मोठे व्यवसायिक असलेले व्यापाऱ्यांनी बँकेचे कर्जे काढून व्यवसाय नुकताच सुरु केलेला आहे असे असताना प्रशासनाने संचार बंदीच्या घोषणा केल्याने व्यापारी वर्गात तीव्र नाराजी पसरलेली आहे. संचार बंदीच्या विरोधात आर्थिक अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांनी सध्या आंदोलन सुरु केलेले आहे. वास्तविक पाहता पंढरपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत अल्प आहे, ग्रामीण भागातून व इतर तालुक्यातून शहारातील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांची संख्या पाहून प्रशासनाने अशा ठिकाणी कंटेंटमेंट झोन केल्यास कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होण्यास मदत होणार आहे असे निवेदनात नमूद केलेले आहे