दीपक पवार यांच्याकडून बदनामीचा केविलवाणा प्रयत्न : “सेबी” वरुन समाधान काळे यांची टीका
पंढरपूर – सीताराम महाराज साखर कारखान्यात ज्यांनी पैसे गुंतवले आहेत, त्या भाग भांडवलधारकांना पैसे परत करण्याची प्रक्रिया नियमितपणे सुरु आहे. दीपक पवारांकडून बिनबुडाचे आरोप करुन संस्थेची व काळे परिवाराची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न वैयक्तिक उदविग्नतेतून जाणून बुजून केला जात आहे ,असे मत सीताराम महाराज साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक समाधान काळे यांनी व्यक्त केले.
सेबीच्या कारवाईमुळे व आपल्या प्रयत्नातून शेतकऱ्यांना पैसे देण्याचा आदेश झाल्याचा दीपक पवार यांनी कांगावा केल्यानंतर काळे यांनी एका प्रसिध्द पत्रकाद्वारे या घटनेचा खुलासा केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील शेतकऱ्यांचा अतिरिक्त उसाचा प्रश्न मोठा होता तो कायमस्वरुपी मिटावा हा उदेश स्व.वसंतदादा काळे यांचा होता. त्यांचे स्वप्न साकार करण्याकरीता दादांबरोबर काम केलेल्या जेष्ठ सहकाऱ्यांना बरोबर घेवून कारखाना उभा राहिला. या भागातील शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गळीतास जावून त्यांना मोबदला मिळू लागला. परंतु निसर्गाच्या कोपामुळे सलग पडलेल्या दुष्काळामुळे कारखाना आर्थिक अडचणीत सापडला.
विरोधक फक्त विरोधाला विरोध करायचा म्हणून आपल्याला कशी प्रसिध्दी मिळेल या करीता वारंवार तक्रारी करीत आहेत. परंतु त्यामध्ये काहीही तथ्य नसून आम्ही नियमाप्रमाणे भागभांडवलधारकांना त्यांची रक्कम देण्याचे काम सेबी व आर.ओ.सी.च्या आधीन राहून नियमितपणे चालू असून कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही. यापूर्वीही भाग भांडवल धारकांना वर्तमानपत्राद्वारे जाहीर आवाहन केलेले होते, त्या अनुषंगाने इच्छुक भाग भांडवल धारकांना रक्कम त्यांचे बँक खातेवर वर्ग केलेली आहेत. उर्वरित इच्छुक भाग भांडवलधारकांना पैसे देण्याची कामकाज सुरु असून विरोधकांनी केलेल्या भूलथापांना भागभांडवल धारक कधीही बळी पडणार नाहीत, असा विश्वास समाधान काळे यांनी व्यक्त केला.
आमच्यावर विश्वास
कारखान्याच्या भाग भांडवलदारांनी आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आहे. मात्र स.शि.वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यावर घडलेल्या कायदेशीर घडामोडीमुळे वैफल्यग्रस्त झालेल्या मानसिकतेमधून दोन तीन महिन्यातून एकदा असे प्रकार सातत्याने घडत आहेत. कायद्याचे ज्ञान असणाऱ्यांनी सुरुवातीस स.शि.वसंतराव काळे सह.साखर कारखान्यामध्ये आगोदर स्वत:स वाचवावे ,असा टोला काळे यांनी लगावला. सध्या सहकार शिरोमणीचे प्रति दिन 4 हजाराहून अधिक गाळप सुरु आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने सुरु आहे. विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा चांगल्या कामाचे कौतुकही त्यांच्याकडून व्हावे ,अशी माफक अपेक्षा सभासदांमधून व्यक्त होत आहे.