राज्य

भीषण पाणीटंचाई : भीमेत योजनांची पाणी पुरवठ्यासाठी कसरत सुरू



पंढरपूर – पंढरपूर शहरासह सांगोला व 81 गावांच्या योजनेला पाणी पुरवणारा पंढरपूरचा बंधारा कोरडा पडत चालल्याने नगरपरिषदांना पाण्याचा उपसा करण्यासाठी कसरत करावी लागत असून पम्पिंग स्टेशनजवळ जेसीबीच्या सहाय्याने चार्‍या खोदून पाणी घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान उजनीतील पाणीस्थिती पाहता यातून नदीत आवर्तन तातडीने सोडणे शक्य नाही तर दुसरीकडे निरा खोर्‍यातील वीर धरण अद्याप शंभर टक्के भरले नसल्याने यातून पाणी सोडता येत नाही, अशी स्थिती आहे.
पावसाने ऑगस्ट महिन्यात ओढ दिल्याने भीमा नदी कोरडी पडली असून पाणी पुरवठ्याची भिस्त असणार्‍या बंधार्‍यांनी आता तळ गाठला असून नदीतील पाणी पम्पिंग स्टेशनपासून दूर असल्याने हे पाणी चार्‍या खोदून उपसा करावे लागत आहे. अशीच गत कासेगाव येथील पाणी पुरवठा योजनेची आहे. नदीपात्रात पाणी पुरवठ्याच्या विहिरी असून दूर साठलेले पाणी चार्‍या खोदून या विहिरीत आणण्यासाठी बुधवारी सकाळपासून काम सुरू होते. पंढरपूर नगरपरिषदेच्या योजनेजवळच सांगोला नगरपरिषद व 81 गावच्या योजनी पम्पिंग स्टेशन आहेत. पोकलेन व जेसीबीच्या सहाय्याने हे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या पंढरपूर शहराला एक दिवसाआड तर सांगोला येथे दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.
पंढरपूर शहराला दररोज 34 एमएलडी म्हणजेच तीन कोटी चाळीस लाख लीटर पाण्याची गरज असते. सध्या पाणी कपात केल्याने जवळपास एक कोटी लीटर पाण्याची बचत होत असून याच पध्दतीने सांगोला व शिरभावी योजनेसाठी ही पाणी कपात करून पाणी वाचविण्यावर भर दिला जात आहे.  उजनी धरणात केवळ 15 टक्के उपयुक्त पाणी साठले असून दौंडची आवक ही चार हजार क्युसेक इतकी कमी आहे. यातच घाटमाथा व भीमा खोर्‍यात पावसाने विश्रांती घेतल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आमदारांचे प्रयत्न सुरू
उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यासाठी समाधान आवताडे , शहाजीबापू पाटील आणि बबनदादा शिंदे हे आ मदार शासन दरबारी प्रयत्न करीत आहेत. भीमा खोर्‍यातील उजनीत कमी पाणी असल्याने किमान नीरा नदीत पाणी सोडून ते पुढे  नृसिंहपूर संगम मार्गे भीमा नदीत आणण्याचा त्यांचा आग्रह आहे. दरम्यान सध्या भीमा नदी कोरडी पडली असून श्रावण महिन्यात विठ्ठल दर्शनाला येणार्‍या हजारो भाविकांनाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

निरा खोर्‍यातून पाण्याची मागणी
यंदाच्या पावसाळ्यात निरा खोर्‍यात चांगला पाऊस झाल्याने तेथील धरण सरासरी 90 टक्के भरली आहेत. यात देवघर प्रकल्प 100 टक्के तर भाटघर 94.24 , गुंजवणी 88 तर वीर प्रकल्पात 71.60 टक्के पाणी आहे. दरम्यान येथून निरा नदीत पाणी सोडून ते पुढे संगममार्गे भीमा नदीत पोहोचवावे अशी मागणी होत असून यामुळे कमी भरलेल्या उजनी धरणावरील ताण कमी होण्यास मदत होवू शकते. मात्र ज्या वीरमधून पाणी सोडावे लागते तेथून दोन्ही कालवे सुरू असून यात 71 टक्के पाणी शिल्लक आहे. हे धरण शंभर टक्के भरल्यानंतरच निरा नदीत पाणी सोडले जाते व याचा फायदा पुढे भीमा नदीला होतो.

उजनीत 15 टक्के पाणीसाठा
उजनी धरणात उपयुक्त स्थितीत केवळ 15 टक्के पाणीसाठा झाला असून मागील दोन दिवसापूर्वी घाटमाथा व भीमा खोर्‍यात झालेल्या पावसाने जी आवक धरणात येत होती ती आता मंदावत चालली आहे. सकाळी चार हजार क्युसेकने पाणी धरणात येत होते. धरणाची स्थिती पाहता यातून सध्या तरी नदी अथवा कालव्यात पाणी सोडणे शक्य होणार नाही. सोलापूरसाठी पाणी सोडतानाच आता भीमा  नदीत पंढरपूर व सांगोला योजनांसाठी पाणी दिले जाईल, असे दिसत आहे

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close