विशेष

यंदाचा सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव स्वेरी कॉलेजमध्ये  रंगणार!


10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान आयोजन; प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांची घोषणा

सोलापूर– तरुणाईचं जान असलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा 19 वा युवा महोत्सव पंढरपूरच्या श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालय (स्वेरी कॉलेज) येथे रंगणार असल्याची माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी दिली. दि. 10 ते 13 ऑक्टोबर 2023 दरम्यान युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. 

यंदाच्या युवा महोत्सवाचे यजमानपद मिळण्यासंदर्भात विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडे श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यानुसार यंदाचा युवा महोत्सव विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. युवा विद्यार्थी कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी उन्मेश सृजनरंगाच्या रूपाने युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. नृत्य-नाट्य-संगीत, ललित, वांग्मय या विभागातील कला प्रकारांचे सादरीकरण युवा महोत्सवात होत असते.

सलग चार दिवस रंगणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सुमारे सोळाशे विद्यार्थी कलावंतांचा सहभाग असतो. एकांकिकेबरोबरच मूकनाट्य, लघुनाटिका, लोकनृत्य, समूहगीत, शास्त्रगीत, शास्त्रीय नृत्य आदी 28 कला प्रकारांचे जोरदार सादरीकरण युवा महोत्सवात होत असते. यंदाचा हा युवा महोत्सव अतिशय चांगला आणि दर्जेदार करू, असे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे आणि विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी सांगितले.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close