राज्य

उजनीतून विमानसेवा सुरू करण्याची चाचपणी, तीन ठिकाणांची तज्ज्ञांकडून पाहणी

पंढरपूर – हनुमान जन्मभूमी कुगाव, पंढरपूर, इंदापूर, पुण्यासाठीचा प्रवास स्वस्तात आणि जलद व्हावा म्हणून उजनी धरणातून विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून धरणातील तीन ठिकाणांची पाहणी करण्यात आली असून, त्यातील दोन ठिकाणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीची ठरणार आहेत. त्यामुळे इंदापूरजवळील कालठण हे ठिकाण निश्‍चित करण्यात आले असून, तसा अहवाल नागरी हवाई उड्डाण मंत्रालयालत पाठविण्यात आला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या मागणीनुसार उजनी धरणातून विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर धरणाच्या दरवाजाजवळ एक ठिकाण विमानसेवेसाठी उत्तम आहे. मात्र, धरणाच्या सुरक्षिततेच्या कारणावरून धरणाजवळ परवानगी देता येणार नाही, असे उजनी जलाशय व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले. तर कुंभारगाव परिसरातील ठिकाणी परदेशातून विविध पक्षी येतात आणि त्या ठिकाणी पक्षी निरीक्षण केंद्र आहे. त्यामुळे त्या ठिकाणालाही मान्यता देता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता कालठणची जागा निश्‍चित करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खासगी टेक्‍निकल एक्‍स्पर्ट यांनी त्या ठिकाणांची पाहणी केली आहे. आता नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाकडून त्यांच्या अहवालाचा अभ्यास करून त्यांच्याकडून पुन्हा स्वतंत्रपणे पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असेही सांगण्यात आले. तत्पूर्वी, त्याला उजनी जलाशय (जलसंपदा) आणि पर्यावरण विभाग व एअर ट्राफिक कंट्रोल विभागाची मान्यता घ्यावी लागणार आहे.

तज्ज्ञांकडून पाहणी

उजनी धरणातून विमानसेवा सुरू करण्याच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खासगी तांत्रिक तज्ज्ञांकडून पाहणी झाली. त्यांनी तीन ठिकाणांची पाहणी केली असून त्यापैकी इंदापूरजवळील कालठण हे ठिकाण सोयीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी आमच्याकडून ना-हकरत प्रमाणपत्र दिले जाईल.

रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, उजनी जलाशय व्यवस्थापन

#पंढरपूर व हनुमान जन्मभूमीला सहजपणे जाता येणार#

उजनी धरणातून विमानसेवा सुरू केल्यानंतर नगर, पुणे, सोलापूर, लातूर यासह विविध जिल्ह्यांतील नागरिकांना विनाविलंब सोयीस्कर प्रवास करता येणार आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग जवळ असल्याने कुगाव च्या हनुमान जन्मभूमीला, पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्यांचीही सोय होणार असून त्यांना कमी वेळेत त्या ठिकाणी पोहोचता येणार आहे. पर्यटनवाढीसही मदत होणार आहे. दरम्यान, कालठण ते कुगाव परिसरात वर्षभर पाणी (४५ ते ५० मीटर खोल) असते. त्या ठिकाणी उभा व आडवा आठ किलोमीटरचा मार्ग विमानसेवेसाठी आहे. या पार्श्‍वभूमीवर त्या परिसरात विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

#पर्यटन वाढीला चालना#

उजनी बॅकवाॅटर परिसरातील कुगाव पर्यटन वाढीबाबत कुगाव ग्रामपंचायत च्या सरपंचपदाच्या कार्यकाळात सकारात्मक प्रयत्न व्हावेत म्हणून पुढाकार घेतला होता. तेव्हापासून खासदार सुप्रिया ताई सुळे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. हनुमान जन्मभूमी कुगाव ला उजनी बॅकवाॅटर परिसरातील भीमा नदीच्या पाण्याने तिनही बाजूने वेढा घातला आहे आता जल हवाई वाहतूक सेवा सुरू झाल्यावर या परिसरातील अर्थव्यवस्थेला पर्यटनाच्या माध्यमातून प्रचंड चालना मिळणार आहे

 तेजस्विनी दयानंद कोकरे माजी सरपंच ग्रामपंचायत कुगाव ता. करमाळा

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close