विशेष

फडणवीस यंदा पंत चौकातूनच परिचारकांना कट मारणार, मात्र आ.आवताडेंच्या कार्यक्रमाला शुक्रवारी जाणार


पंढरपूर – उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस हे उद्या गुरूवारी दोन दिवसांच्या सोलापूर जिल्हा दौर्‍यावर येत असून ते शुक्रवार 4 रोजी कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा सपत्नीक करणार आहेत. दरम्यान त्यांचे पंढरपूर व मंगळवेढा भागात अनेक कार्यक्रम या काळात आयोजित करण्यात आले आहेत. दरम्यान ते यंदा पंत चौकात रस्त्याचे भूमिपूजन करणार असले तरी नेहमीप्रमाणे ते माजी आमदार प्रशांत परिचारक व त्यांचे बंधू उमेश परिचारक यांच्या पंतनगरमध्ये नसल्याचे शासकीय दौर्‍यावरून दिसून येत आहे.
फडणवीस हे पंढरपूरला येत असल्याने जिल्ह्यातील भाजपा  व शिंदे गट शिवसेनेचे अनेक मातब्बर नेते येथे उपस्थित असणार आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात पंढरपूरच्या विकास आराखड्याची बैठक ही आयोजित करण्यात आली आहे. याबाबत पंढरपूर  व वारकरी संप्रदायात मोठी उत्सुकता असून नेमका हा आराखडा कसा असणार आहे याबाबत सध्या चर्चा रंगत आहेत. गुरूवारी सायंकाळी सात वाजता पंढरपूर विश्रामगृहात विकास आराखड्यावर चर्चा होणार आहे. फडणवीस हे सायंकाही साडेपाच वाजता पंढरपूरला येणार असून तेपंत चौक येथे कोर्टी कराड रस्ता ते वाखरी बाह्यवळण रस्त्या या मार्गाचे ते भूमिपूजन करतील. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित असणार आहेत. पंत चौकापासून हाकेच्या अंतरावर पंतनगर आहे. देवेंद्र फडणवीस हे आजवर अनेकदा पंढरपूरला आले आहेत. ते नेहमी भोजन अथवा फराळासाठी परिचारकांच्या पंतनगरमध्ये आवर्जुन भेट देत असत. मात्र यंदा ते पंत चौकातूनच पुढे विश्रामगृहाकडे जाणार असून शुक्रवारी एकादशी दिवशी  ते आमदार समाधान आवताडे व त्यांचे बंधू उद्योजक संजय आवताडे यांच्या आवताडे शुगर्स अ‍ॅण्ड डिस्टीलरीज या कारखान्यात मोळी पूजन करून गळीत हंगामाची सुरूवात करणार आहेत. आवताडे यांचे निमंत्रण फडणवीस यांनी स्वीकारले आहे.
मध्यंतरी दामाजी कारखान्याच्या निवडणुकीपासून आवताडे व परिचारक यांच्यात अंतर निर्माण झाले आहे तर दुसरीकडे भीमा सहकारीच्या निवडणुकीत ही भाजपा खासदार धनंजय महाडिक व परिचारक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. आवताडे , महाडिक ही फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत.
यानंतर सायंकाळी सात वाजता पंढरपूर विकास आराखड्याची बैठक होणार आहे. शुक्रवार 4 रोजी पहाटे पहाटे 2 वाजता ते मंदिरात श्री विठ्ठल रखुमाईच्या शासकीय महापूजेसाठी पोहोचतील. यानंतर पहाटे संत नामदेव महाराज वाड्यात ते जयंती निमित्त दर्शनासाठी जाणार आहेत.  पहाटे पाच वाजता संत नामदेव महाराजांच्या 725 व्या जयंतीनिमित्त आयोजित पंढरपूर ते घुमान पंजाब या सायकल रॅलीच्या शुभारंभ कार्यक्रमात सहभागी होतील.
उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस हे सकाळी अकरा वाजता विष्णुसहस्त्रनाम मातृपितृ सेवामंदिराला भेट देणार असून तेथे आचार्य वेदान्तवाचस्पति जगन्नाथ महाराज पवार यांच्या मूर्तीचे अनावरण करणार आहेत.
यानंतर फडणवीस हे हेलिकॉप्टरने मंगळवेढा तालुक्यात जाणार असून ते नंदूर येथे आवताडे शुगर्स अ‍ॅण्ड डिस्टीलरीज यास कारखान्याच्या दुपारी साडे बारा वाजता गळीत हंगामाचा शुभारंभ करणार आहेत. यानंतर ते बार्शीकडे प्रयाण करतील.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close