पंढरपूर शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, वीज पडून एक मृत्यूमुखी, टाॅवर- झाडं उन्मळली


पंढरपूर – मान्सूनपूर्व पावसाने रविवार 26 मे रोजी सायंकाळी पंढरपूर शहर व तालुक्याला जोडपून काढले असून वादळीवारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान भटुंबरे येथे वीज पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेमध्ये दोन महिला जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले होते. भटुंबरे येथील विठ्ठलवाडी विसावा येथे सायंकाळी वीज पडल्याने या दुर्घटनेत शारदा कल्याण कुंभार( वय 45) ही महिला मृत्युमुखी पडली. तर बाळाबाई रतन वाघमारे (वय 35) लक्ष्मी महादेव आडगळे (वय 42) या जखमी झाल्या आहेत. पंढरपूर शहर व तालुक्यात रात्री साडेआठ पर्यंत पावसाचा जोर होता.या वादळी वारे व पावसामुळे अनेक ठिकाणी झाड उन्मळून पडली आहेत. फुलचिंचोली येथील मुरलीधर काळे पाटील यांच्या घरासमोरील पन्नास वर्षाचे चिंचेचे झाड जनावरांच्या शेडवर कोसळून मोठे नुकसान झाले आहे. येथील जनावरांनाही दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान कासेगाव, करकंब भटुंबरे, अनवली या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे.

अनवली येथे विजेचा टॉवर वाकला होता तर मुंडेवाडी भागामध्ये अनेक ठिकाणी झाड पडल्याचे सांगण्यात आले. हा मान्सून पूर्व पाऊस रविवारी दुपारी पाचच्या दरम्यान पंढरपूर शहरांमध्ये सुरू झाला. यानंतर त्याची व्याप्ती संपूर्ण तालुक्यात पसरली होती. कासेगाव भागामध्ये रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. याचबरोबर तेथील द्राक्ष व डाळिंबाच्या भागांमध्ये ही पाणी साचले आहे. या मान्सूनपूर्व पावसाने व वादळी वाऱ्याने शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. मागील दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्याने तालुक्यातील केळीच्या बागा व अन्य पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सर्वच राजकीय पक्ष व संघटनांकडून होत आहे.
सायंकाळी पंढरपूर शहरात पुन्हा पाऊस सुरू झाल्यानंतर वीज गायब झाली होती. ती रात्री सव्वा आठ पर्यंत बंदच होती.

