विशेष

ठरलं..पंढरपूरमधील आषाढीच्या संचारबंदीचे.. प्रशासन भूमिकेवर ठाम , लवकरच सविस्तर आदेशाची शक्यता


सोलापूर-  कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असली तरी अद्याप संपूर्णतः या विषाणूचा कहर कमी झालेला नाही. तसेच तिसर्‍या लाटेचा इशारा ही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी देत आहेत. यामुळे आषाढी वारी प्रतीकात्मकरित्या साजरी होत असून 17 ते 25 जुलैपर्यंत  पंढरपूर शहराबरोबरच परिसरातील 10 गावांत  संचारबंदी लागू करण्यास जिल्हा प्रशासन अनुकूल असून याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी मिलिंद  शंभरकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. याबाबतचा सविस्तर आदेश लवकरच प्राप्त होईल असे दिसते.
पंढरपूरला भरणारी आषाढी यात्रा यंदाही होवू शकणार नाही हे निश्‍चित झाले असून राज्य सरकारने पायीवारीला परवानगी दिलेली नाही. येणार्‍या मानाच्या दहा पालख्यांबाबत नियम आखून दिले आहेत. दरम्यान दुसरी लाट अद्यापही सुरूच आहे मात्र याचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्याने सरकारने काही निर्बंध हटवून नागरिकांची सोय केली असली  तरी यात्रा व जत्रा तसेच मोठे धार्मिक कार्यक्रम आयोजित करणे शक्य नाही. यामुळेच मागील वर्षीप्रमाणेच आषाढी प्रतीकात्मक साजरी केली जाणार आहे. यातच  गेल्या वर्षीपेक्षा यंदा राज्यात  आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अजूनही कोरोना संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत.  त्यामुळे  पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी  पंढरपूरबरोबरच परिसरात संचारबंदी लागू  करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे  मंजुरीसाठी सादर केला होता.


या  प्रस्तावावर शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांनी पोलीस, आरोग्य व अन्य संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन चर्चा केली. चर्चेअंती पंढरपूरमधीलसंचारबंदीवर एकमत झाल्याचे  समजते व याचे सविस्तर आदेश लवकरच जारी केले जाणार आहेत.
आठ दिवसाच्या संचारबंदीला पंढरपूरमधील काहींनी विरोध केला होता. व्यापारी या निर्णयावर नाराज होते व त्यांनी याचा फेरविचार करावा यासाठी आमदार व अन्य पदाधिकार्‍यांनाशी चर्चा केली होती. मात्र सध्याची कोरोनाची स्थिती पाहता व नवीन डेल्टा प्लस स्टेनचा धोका पाहता प्रशासन व राज्य सरकार मोठ्या प्रमाणात सावधनात बाळगत आहेत. यामुळेच आषाढी यात्रा काळात निर्बंध कडक असणार हे निश्‍चित आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक रूग्ण हे पंढरपूर तालुक्यातच आजवर आढळून आले असून सर्वाधिक मृत्यूची नोंद ही याच तालुक्यात आहे. यामुळे येथे गर्दी होणे परवडणारे नाही. यासाठी आषाढीला आठ दिवसाची संचारबंदी पुकारली जावी असा मतप्रवाह आहे.
यंदा मानाच्या सर्व 10 पालख्या  बसमधून दशमीदिवशी पंढरपूर येथे येणार असून, पौर्णिमेला परत जाणार आहेत.  त्यामुळे 17 ते 25 जुलैपर्यंत भाविकांची गर्दी रोखण्यासाठी संचारबंदीचा प्रस्ताव  देण्यात आला होता. या काळात सोलापूर  जिल्हा सीमा, पंढरपूर तालुका सीमा  आणि पंढरपूर शहर सीमा अशा तीन  ठिकाणी तिहेरी नाकाबंदी करण्यात येणार  असून, परवानगी दिलेल्या भाविकांशिवाय कोणालाही आषाढीसाठी प्रवेश दिला जाणार नाही. तरीही काही
भाविक पंढरपूरकडे आलेच तर त्यांची समजूत घालून त्यांना परत पाठवले जाणार आहे. ऐकत नसतील तर कारवाई केली जावू शकते. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मागील वर्षीही अशाच
पध्दतीने आषाढीच्या काळात भाविकांना पंढरीत येण्यापासून रोखण्यात आले होते. यानंतर वर्षभरातील  सर्वच यात्रांच्या बाबतीत हीच पध्दत अवलंबली गेली  होती. आता सलग दुसर्‍या वर्षी आषाढी वारीवर कोरोनाचे सावट आहे.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close