नागपूर – पणजी नव्या महामार्गात या क्षेत्रांचा समावेश करण्याची आ.मोहिते पाटील यांची मागणी
पंढरपूर – नागपूर – पणजी (गोवा) या नवीन महामार्गाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या प्रस्तावित महामार्गात नागपूर पासून नागपूर – बुटीबोरी – वर्धा – महागाव – अर्धापूर – अंबाजोगाई – परळी वैद्यनाथ – कुर्डुवाडी – अकलूज – म्हसवड – विटा – कोल्हापूर – पणजी या क्षेत्रांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पत्राद्वारे नुकतीच केली आहे.
तसेच याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. याबाबतची माहिती देताना आ. मोहिते पाटील म्हणाले, हा महामार्ग बनवत असताना या मार्गावरील धार्मिक तीर्थस्थळांचा विचार करून ‘नागपूर – बुटीबोरी – वर्धा – महागाव – अर्धापूर – अंबाजोगाई – परळी वैद्यनाथ – कुर्डुवाडी – अकलूज – म्हसवड – विटा – कोल्हापूर – पणजी’ अशा मार्गाची आखणी करावी. यामुळे अंतर कमी होऊन ते पार करण्यास लागणारा वेळ कमी होईल. याबरोबरच वाटेतील रेणुका माता देवी (माहूर) ,योगेश्वरी देवी (अंबाजोगाई), वैद्यनाथ मंदिर (परळी वैजनाथ), नीरा नृसिंहपूर, श्रीनाथ मंदिर, म्हसवड, महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर) ही तीर्थस्थळे जोडली जाणार आहे.
तसेच हा महामार्ग झाल्यास प्रस्तावित सुरत – चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग, पुणे – बंगळुरू द्रुतगती महामार्ग, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, मुंबई – गोवा ग्रीनफिल्ड महामार्गाला जोडला जाईल. ज्याचा फायदा दूरच्या पल्ल्याची वाहतूक सुखकर होण्यास होईल. मोठ्या शहरांशी ही प्रस्तावित गावे जोडली गेल्यावर या भागातील विकासाला चालना मिळेल आणि जलद दळणवळण आणि भू संपादन प्रक्रिया देखील सुलभ होईल.
त्यामुळे याचा विचार करून संबंधित ठिकाणे समाविष्ट करण्याबाबत आदेश द्यावेत, अशा मागणीचे निवेदन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांना दिले असल्याचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले .